देशातील सर्वात लांब समुद्री पूल अटल सेतूचे लोकार्पण

yongistan
By - YNG ONLINE
भारतातील सर्वाधिक लांबीचा समुद्री पूल, जगात १२ वे स्थान
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रातला बहुप्रतिक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प म्हणजेच अटलबिहारी वाजपेयी स्मृती न्हावाशिवा अटल सेतूचे युवादिनी म्हणजेच १२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. हा ट्रान्स हार्बर लिंक हा अभियांत्रिकी चमत्कार म्हणावा, असा आहे. 

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल सेतू  शिवडी इथून सुरू झाला, ज्या ठिकाणावरून एमटीएचएलची सुरुवात होते. हा रस्ता शिवडी येथून थेट समुद्रमार्गे चिरले गावी म्हणजेच न्हावा शेवापर्यंत जातो. एकूण २२ किमीचा हा मार्ग असून त्यातील १६.८० किमी रस्ता समुद्रातून आहे. हा भारतातील सर्वाधिक लांबीचा समुद्री पूल असून जगात हा १२ व्या स्थानी आहे. सध्या या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून, काही ठिकाणी छोटे मोठे काम सुरू आहे. 

तब्बल १८ हजार कोटी रुपये खर्चून बनवण्यात आलेला हा प्रकल्प मुंबईसह नवी मुंबई, रायगड आणि इतर शहरांमधील अंतर केवळ २० मिनिटांवर आणणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी मैलाचा दगड म्हणजे हा प्रकल्प असणार आहे.

प्रत्येक १०० मीटरवर अद्ययावत सीसीटिव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. एकूण १३० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पुलावर काही ठिकाणी १०० किमी प्रतितास तर काही ठिकाणी ८० आणि ६० किमी प्रतितास अशी वेग मर्यादा आहे. या पुलावरून प्रवास करताना आपल्याला टोल भरण्यासाठी थांबावे लागणार नाही. ओपन रोड टोलिंग असलेला हा भारतातला पहिलाच रस्ता आहे.   

पृथ्वीच्या ७ प्रदक्षिणा पूर्ण 
होतील एवढ्या लांबीचे केबल

-८४ हजार टन वजनाचे ७० डेक या सेतूमध्ये वापरण्यात आले. 
-सागरी सेतूसाठी ऑर्थोट्रोपिक स्टील डेक तंत्रज्ञानाचा वापर 
-पृथ्वीच्या ७ प्रदक्षिणा पूर्ण होतील, एवढ्या लांबीच्या केबलचा वापर
-५०० बोईंग विमाने, १७ आयफेल टॉवर एवढ्या वजनाचा भार घेण्याची क्षमता ट्रान्स हार्बर लिंक पुलामध्ये आहे. 
-संपूर्ण देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू
-लांबीच्या निकषानुसार जगातील १० व्या क्रमांकाचा पूल 

२२ कि.मी.चा अटल 
सेतू ठरणार गेमचेंजर
तब्बल १७,८४० कोटी रुपये खर्चून २१.८ किमी लांबीचा मुंबई ट्रान्सहार्बर लिंक रोड उभा केला. अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू असे नाव देण्यात आले आहे. या प्रकल्पाची समुद्रावरील लांबी १६.५० किमी आहे आणि जमिनीवरील भाग ५.५ किमी आहे. यामुळे २ तासांचा प्रवास आता २० मिनिटात होणार आहे. यातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी बंदर, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि मुंबई-गोवा हायवेशी वेगवान दळणवळण शक्य होईल. मुंबई-नवी मुंबईवरून पनवेल, अलिबाग, पुणे आणि गोव्याला जाणा-या प्रवाशांचा प्रवास या मार्गामुळे सोपा होणार आहे.