नवी दिल्ली : वृत्तसंस्था
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची शनिवार, दि. १३ जानेवारी २०२४ रोजी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलीे. इंडिया आघाडीच्या व्हर्च्युअल बैठकीत खर्गे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे आता इंडिया आघाडीचे नेतृत्व खर्गे यांच्याकडे राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना संयोजकपदी नियुक्त करण्यात येणार होती. मात्र, नितीशकुमार यांनी पद स्वीकारण्यास नकार दिला. संयोजक पदाची गरज नसल्याचे मत नितीश कुमार यांनी मांडल्याचे शरद पवारांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपा संदर्भात ‘इंडिया’ आघाडीची दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून बैठक पार पडली. या बैठकीला ‘इंडिया’ आघाडीतील १४ पक्ष सहभागी झाले होते. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बैठकीला उपस्थित राहिल्या नाहीत. नितीश कुमार यांना संयोजक म्हणून नियुक्त करण्यासाठी जनता दलाकडून (संयुक्त) दबाव टाकण्यात येत होता. मात्र, यास तृणमूल काँग्रेसने विरोध केला. ‘इंडिया’ आघाडीच्या मागील बैठकीत ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानपद आणि संयोजकपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता.
विरोधी पक्षांच्या आघाडीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपाचा फॉर्मुला अद्याप निश्चित झालेला नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार संयोजक पदाचे दावेदार होते. मात्र, बैठकीत खुद्द नितीश कुमार यांनी काँग्रेसच्या नेत्याने हे पद सांभाळले पाहिजे, असे सांगितले.