ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन

yongistan
By - YNG ONLINE
पुणे : प्रतिनिधी
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे शनिवार, दि. १३ जानेवारी २०२४ रोजी पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. प्रभा अत्रे यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशा तिन्ही पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. प्रभा अत्रे या किराणा घराण्याच्या गायिका होत्या.
प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका आणि विदुषी म्हणून प्रभा अत्रे या रसिकांच्या स्मरणात राहतील. ख्याल गायकीसह ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही त्यांचे प्रभुत्व होते. भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्यात प्रभा अत्रे यांचा खूप मोठा वाटा आहे.आपल्या कार्यक्रमांत त्या अनेकदा स्वत: रचलेल्या बंदिशी सादर करत असत. त्यांच्या काही रचना, मारू बिहाग रागातील जागू मैं सारी रैना, कलावती रागातील तन मन धन, किरवाणी रागातील नंद नंदन यांचे सूर आजही रसिकांच्या कानात घुमत आहेत. आज या स्वरयोगिनीची स्वरसाधना शांत झाली.
वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांनी गाणे शिकण्यास सुरुवात केली. किराणा घराण्याचे जेष्ठ गायक पं. सुरेशबाबू माने आणि जेष्ठ गायिका हिराबाई बडोदेकर यांच्याकडे संगीत शिक्षणाचे धडे घेतले. भारतरत्न पं भीमसेन जोशी यांनी सुरू केलेल्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवात त्यांनी अनेकवर्ष गायकी सादर केली. तसेच गेली काही वर्ष त्यांनी महोत्सवाची सांगता गायकीने केली. भारतीय शास्त्रीय संगीताचा त्यांचा गाढा अभ्यास होता. शास्त्रीय गायकीबरोबर त्यांनी नवीन रागांची निर्मिती केली त्यामध्ये अपूर्व कल्याण, मधुरकंस, पटदीप, मल्हार, भैरव रवी भैरव याचा समावेश आहे.