लंडन : भारतासह आशियाई देशांत दहशत निर्माण करणा-या प्राणघातक ‘निपाह’ विषाणूविरोधातील पहिली लस जगप्रसिद्ध ‘ऑक्सफर्ड’ विद्यापीठाने तयार केली असून या लसीच्या माणसावरील चाचण्या देखील लवकरच सुरू होणार आहेत. कोरोनापेक्षाही ‘निपाह’चा संसर्ग हा सर्वाधिक वेगाने पसरतो, यातील मृत्यूदराचे प्रमाण हे ७५ टक्के एवढे आहे.
‘सीएचएडीओएक्स १ निपाह बी’ असे या लसीचे नाव आहे. विषाणूंच्या प्राणघातक संसर्गाला रोखण्यासाठी ऑक्सफर्ड लस समूह वेगवेगळ््या लशींच्या निर्मितीवर काम करतो आहे. आता त्याला ‘निपाह’ला रोखणारी लस तयार करण्यात देखील यश आले आहे. या नव्याने तयार करण्यात आलेल्या लसीचा १८ ते ५५ वयोगटातील ५१ जणांवर प्रयोग करण्यात येईल.
संशोधकांनी १९९८ मध्ये ‘निपाह’ विषाणू शोधून काढला होता. या संशोधनाला २५ वर्षे उलटून गेल्यानंतरही त्यावर लस तयार करण्यात संशोधकांना यश आले नव्हते. हा विषाणू वेगाने पसरतो तसेच त्याचा मृत्यूदर देखील मोठा आहे. आता नव्या लसीमुळे या विषाणूचा स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील उद्रेक रोखता येऊ शकतो. मध्यंतरी सिंगापूर, मलेशिया, बांगलादेश आणि भारत या देशांमध्ये ‘निपाह’च्या विषाणूचा संसर्ग पसरला होता. प्रामुख्याने वटवाघळांमुळे या विषाणूचा प्रसार होत असल्याचे दिसून आले होते. डुक्कर अथवा अन्य बाधित प्राण्यांच्या संपर्कात आल्यानेदेखील या विषाणूचा संसर्ग होतो तसेच एका व्यक्तीपासून दुस-या व्यक्तीला देखाल या विषाणूचा संसर्ग होत असल्याचे दिसून आले.