वॉशिंग्टन : जगात श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढत चालली आहे. दावोसमध्ये झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत ऑक्सफॅमचा अहवाल सादर करण्यात आला. जगातील पाच श्रीमंत व्यक्तींची संपत्ती दुप्पट झाली असताना ५ अब्ज लोक आर्थिक संकटाचा सामना करत आहेत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जगातील सर्वांत श्रीमंत
फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क आहेत ज्यांची सध्याची एकूण संपत्ती २३० अब्ज डॉलर आहे. बर्नार्ड अर्नाल्ट १८२.४ अब्ज डॉलर्ससह दुस-या स्थानावर आहेत. अॅमेझॉनचे जेफ बेझोस १७६.९ अब्ज डॉलर संपत्तीसह तिस-या स्थानावर आहेत. लॅरी एलिसन १३५.२ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह चौथ्या स्थानावर आणि मार्क झुकेरबर्ग १३२.३ अब्ज डॉलर्ससह पाचव्या स्थानावर आहेत.
चार वर्षांत तासाला १४
दशलक्ष डॉलर कमावले
गेल्या चार वर्षात जगातील पाच सर्वात श्रीमंत व्यक्तींनी दर तासाला १४ दशलक्ष डॉलर्स कमावले. जर आपण ही रक्कम भारतीय चलनात रूपांतरित केली तर ती अंदाजे ११६ कोटी रुपये होते. याचा अर्थ जगातील ५ सर्वात श्रीमंत व्यक्तींनी गेल्या ४ वर्षात दर तासाला १०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली.
८०० दशलक्ष कामगारांच्या पगारात घट
पगार कपातीमुळे कामगारांसमोर अन्न व उदरनिर्वाहाचे संकट उभे राहिले आहे. जगभरात सुमारे ८०० दशलक्ष कामगारांच्या वेतनात घट झाली आहे. कर्मचा-यांचे २५ दिवसांचे वार्षिक उत्पन्न कमी होत आहे. या अहवालानुसार टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क, बर्नार्ड अर्नॉल्ट, अॅमेझॉनचे जेफ बेझोस, ओरॅकलचे सहसंस्थापक लॅरी एलिसन आणि गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांच्यासह अनेक श्रीमंत लोकांच्या संपत्तीत वाढ झाली.
दुसरीकडे ऑक्सफॅमच्या अहवालानुसार आर्थिक विषमतेच्या दृष्टीने गेली काही वर्षे अत्यंत वाईट असल्याचे सिद्ध झाले आहे. गेल्या चार वर्षात कोरोना महामारी, युद्ध आणि महागाई या कारणांमुळे कोट्यवधी लोक गरीब झाले आहेत. २०२० नंतर आतापर्यंत जगभरात सुमारे ५ अब्ज लोक गरीब झाले आहेत. दुसरीकडे काही निवडक लोकांची संपत्ती मात्र वेगाने वाढली आहे.