शिवसेना शिंदेंचीच

yongistan
By - YNG ONLINE
ठाकरेंना धक्का, दोन्ही गटांचे आमदार पात्र, विधानसभा अध्यक्षांचा ऐतिहासिक निकाल
मुंबई : प्रतिनिधी
तब्बल दीड वर्ष चाललेला शिवसेनेतील सत्तासंघर्षानंतर दि. १० जानेवारी २०२४ रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जवळपास दीड तास निकालाचे वाचन करताना मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निकाल दिला. यासोबतच राष्ट्रीय कार्यकारिणीशी सल्लामसलतीशिवाय पक्षप्रमुखाचा अधिकार मान्य करता येत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना कोणावरही कारवाई करण्याचा अधिकार पोहोचत नाही, असे सांगतानाच शिंदे गटाचे व्हीप भरत गोगावले यांचा व्हीप वैध असल्याचा निर्वाळा दिला. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, गोगावले यांनी बजावलेल्या व्हीपचे पुरावे ते सादर करू शकले नाहीत, त्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरविता येणार नाही, असे सांगत ठाकरे गटाचे आमदारही पात्र ठरविले. या निकालानंतर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला, तर दुसरीकडे शिंदे गटाने निकालाचे स्वागत तर ठाकरे गटाने निकालाचा निषेध केला. 

पक्षाची घटना, नेतृत्व आणि विधिमंडळातील बहुमत याचा अभ्यास करून एकनाथ शिंदे यांच्या गटाला मी खरी शिवसेना म्हणून मान्यता देतो, असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांचे आमदार भरत गोगावले यांचा व्हिपही राहुल नार्वेकर यांनी वैध ठरवला आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी निवड वैध ठरवत सुनील प्रभूंना पक्षासाठी कोणतीही बैठक बोलावण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे शिंदे गटाच्या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी फेटाळली. त्याचवेळी भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून केलेली निवड योग्य असल्याचे सांगत सुनील प्रभू यांची निवड २१ जूनलाच संपुष्टात आल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.

यासोबतच उद्धव ठाकरे यांनी दिलेली घटना ग्रा  धरता येणार नाही. निवडणूक आयोगाने दिलेली घटनेची प्रत वैध आहे. २०२३ मध्ये निवडणूक आयोगाकडून शिवसेनेच्या घटनेची प्रत मिळाली. २०१८ साली घटनेत केलेले बदल वैध धरता येणार नाहीत, असे म्हणत विधानसभा अध्यक्षांनी महत्वाचे निरीक्षण नोंदविले. उद्धव ठाकरे उलटतपासणीला आले नाहीत, म्हणून ठाकरे गटाचे प्रतित्रज्ञापत्र अमान्य आहे. १० व्या सूचीनुसार मला फक्त राजकीय नेतृत्व बघायचे आहे.  दोन्ही गटाने पक्षाच्या वेगवेगळ््या घटना दिल्या. १९९९ मध्ये निवडणूक आयोगात असलेली प्रत ग्रा  धरली गेली. पक्षाचा प्रमुख कोण, फक्त आणि फक्त इतकेच ठरवणार आहे, असे राहुल नार्वेकर म्हणाले. 

उद्धव ठाकरे गटाकडून याचिकेत केल्या गेलेल्या दाव्यांवर नार्वेकरांकडून सवाल उपस्थित केले गेले, त्याला उत्तर देताना शिंदे गटाने सादर केलेली उत्तर आणि पुराव्यांशी मी सहमत असल्याचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केले. पक्षात बंडखोरी झाल्यानंतर खरा पक्ष कोणाचा हा मुद्दा विचारात घेणे महत्त्वाचे होते. २१ जून २०२२ रोजी शिवसेनेत दोन गट पडले. पक्षात दोन गट पडले हे २२ जून रोजी लक्षात आले.  २२ जून २०२२ रोजी विधानसभा अध्यक्ष या नात्याने माझ्यासमोर आलेले मुद्देही महत्त्वाचे आहेत.  

पक्ष कुणाचा ठरविण्याचा 
अधिकार मलाच : नार्वेकर
शिवसेना कुणाची, याचे उत्तर त्यांच्या पक्ष नेतृत्त्वाच्या निवड पद्धतीवर अवलंबून आहे. २३ जानेवारी २०१८ रोजी शिवसेनेत अंतर्गत निवडणूक झाली नाही, असे निरीक्षण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोंदवल. नेतृत्त्वाची रचना तपासण्यापुरताच पक्षघटनेचा आधार असून खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार फक्त मलाच, असे विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केले.

म्हणून ठाकरे गटाचे आमदार पात्र
एकनाथ शिंदे यांच्या गटाचे व्हिप भरत गोगावले यांचा पक्षादेश ठाकरे गटाला किंबहुना ठाकरे गटातील सदस्यांना दिला असल्याचे पुरावे शिंदे गट सादर करू न शकल्याने त्यांची याचिका फेटाळून लावत असल्याचे सांगत ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. दीड तासांच्या निकाल वाचनात त्यांनी प्रथमच एकनाथ शिंदे यांची याचिका फेटाळून लावली. म्हणजेच शिंदे गटाप्रमाणेच ठाकरे गटाच्या आमदारांनाही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पात्र ठरवले.