मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी २१ राज्यांतील १०२ मतदारसंघांत मतदान होणार असून यात महाराष्ट्रातील ५ मतदारसंघ आहेत. राज्यातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक व भंडारा-गोंदिया या ५ मतदारसंघांत मतदान होत असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह दिग्गजांचे भवितव्य उद्या मतदान यंत्रात बंद होणार आहे. मतदान सुरळीत पार पडावे यासाठी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यात ५ मतदारसंघांत ९५ लाख ५४हजार ६६७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी १० हजार ६५२ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. या वेळी तब्बल १ लाख ४१ हजार नवमतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा-गोंदिया या ५ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने विदर्भातील १० जागांपैकी ९ जिंकल्या होत्या; परंतु या वेळी सर्वच मतदारसंघांत चुरशीच्या लढती होत आहेत.
नागपूर मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसच्या विकास ठाकरे यांची लढत होत आहे तर चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार व काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात काट्याची टक्कर आहे. रामटेकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे राजू पारवे, काँग्रेसचे शामकुमार बर्वे आणि वंचितचे किशोर गजभिये यांच्यात तिरंगी लढत होत आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघात सुनील मेंढे (भाजपा) वि. प्रशांत पडोळे (काँग्रेस) अशी लढत आहे. गडचिरोली-चिमूर येथे अशोक नेते (भाजपा) विरुद्ध नामदेव किरसान (काँग्रेस) यांच्यात लढत आहे.