इंदापूरच्या शामलची यूपीएससीत भरारी

yongistan
By - YNG ONLINE
पुणे : कितीही खडतर परिस्थिती आली, तरी बरेचजण त्याला न डगमगता हवे ते मिळवतात. पुणे जिल्ह्यातील शामल भगत  ही तरुणी अशाच लढणा-यांपैकी एक आहेत. दहावी झाल्यानंतर लग्नासाठी आलेले स्थळ नाकारत तिने बंडखोरी केली आणि आता ती थेट आयएएस झाली आहे. एप्रिल २०२४ मध्ये यूपीएससीचा निकाल लागला असून वयाच्या २४ व्या वर्षी तिने देशात २५८ वा क्रमांक पटकावत आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले.  
शामल भगत ही तरुणी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील नीरा नदीच्या काठी वसलेल्या भगतवाडी या गावची आहे. वडील कल्याण भगत हे शेती आणि रंगकाम करण्याचा व्यवसाय करतात. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने तिने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत चौथीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर शेजारच्या निमगावात माध्यमिक शिक्षण झाले. लहानपणापासून हुशार असलेली शामल दहावीत शाळेत पहिली आली. त्यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षण सराटी गावातील जिजामाता विद्यालय येथे झाले. तिथेही तिने पहिला नंबर मिळविला. पुण्यातील महात्मा फुले कृषी महाविद्यालयात बी.एसस्सी अ‍ॅग्रीची पदवी पूर्ण केली. त्यावेळी तिने विद्यापीठाचे सुवर्ण पदकही पटकावले होते. विशेष म्हणजे दहावी झाल्यानंतर शामलला तिच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी स्थळ आणले. पण शामलने त्याला विरोध करत शिक्षण पूर्ण करण्याचा पवित्रा घेतला. 
शिक्षणामध्ये हुशार असलेल्या शामलने पहिल्यापासून कलेक्टर होण्याचे निश्चित केले होते. पहिल्या प्रयत्नात तिला पूर्व परीक्षेत यश आले नाही. मग दुस-यावेळी प्रचंड मेहनत घेतली आणि दुस-या प्रयत्नात मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली. मुलाखतीच्या तारखा समोर असताना शामलच्या आईचे कर्करोगाने निधन झाले. त्यामुळे तिच्या डोळ्यापुढे काळोख निर्माण झाला. पण आलेल्या परिस्थितीला जिद्दीने तोंड देण्याची शामलची लहानपणापासूनची सवय. त्यामुळे ती या दु:खातूनही सावरली आणि मुलाखतीला गेली. 
अखेर यूपीएससीचा निकाल लागला आणि शामल देशात २५८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. शामलने आपल्या आईचे स्वप्न पूर्ण केले. तिच्या या यशात तिच्या कुटुंबीयांचा, भावंडांचा मोठा हातभार आहे. ग्रामीण भागातली मुलगी, कोणताही क्लास न लावता यूपीएससीसारखी परीक्षा यशस्वी झाली. त्यामुळे शामलचे यश हे अधिक झळाळून निघाले.