१९५१ पासून लोकसभेत ३४ खासदार बिनविरोध

yongistan
By - YNG ONLINE
२०२४ मध्ये सुरत मतदारसंघातून मुकेश दलाल बिनविरोध, भाजपने खाते उघडले
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सुरतमध्ये झालेल्या बिनविरोध निवडणुकीत विजयी झालेले मुकेश दलाल यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचे खाते उघडले आहे. कॉँग्रेससह विरोधी पक्षांनी या बिनविरोध निवडणुकीवरून भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. मात्र, ही बिनविरोध निवडीची परंपरा पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून चालत आली असून देशात १९५१ पासून आतापर्यंत असे ३४ जण बिनविरोध निवडून आले होते. त्यात यशवंतराव चव्हाण यांचाही समावेश आहे.
सुरत लोकसभा मतदारसंघात भाजप वगळता अन्य सर्व उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली आहे. कॉँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज प्रस्तावकांच्या स्वाक्षरींमधील तफावतीमुळे जिल्हा निवडणूक अधिका-यांनी फेटाळला होता. मुकेश दलाल यांच्या आधी मागील ७ दशकांमध्ये १९५१ पासून अशाच प्रकारे ३४ जणांची बिनविरोध निवड झाली आहे. अलिकडच्या काळात म्हणजे २०१२ ला समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव यांनी कन्नौज लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध जिंकली होती.
अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांच्या पत्नी डिंपल यादव यांना बिनविरोध खासदारकीची संधी मिळाली होती. त्याआधी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री राहिलेले यशवंतराव चव्हाण हेदेखील लोकसभेवर नाशिकमधून बिनविरोध निवडून गेले होते. यासह नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारुख अब्दुल्ला, हरेकृष्णा महताब, टी. टी. कृष्णमाचारी, पी. एम. सईद आणि एस. सी. जमीर हे देखील बिनविरोध निवडून येऊन खासदार झाले होते.
१९५७ मध्ये ७ उमेदवार बिनविरोध
१९५७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त ७ उमेदवार बिनविरोध जिंकले. त्याआधी १९५१ च्या आणि त्यानंतर १९६७ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रत्येकी पाच उमेदवारांनी बिनविरोध विजय मिळवला होता. १९६२ मध्ये ३ आणि १९७७ मध्ये २ उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते तर १९७१, १९८० आणि १९८९ मध्ये प्रत्येकी एक उमेदवार अशाच पद्धतीने निवडणूक जिंकला होता.