दाभोलकर हत्या प्रकरणी दोघांना जन्मठेप

yongistan
By - YNG ONLINE
तिघांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका
पुणे : प्रतिनिधी
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात विशेष न्यायालयाने शुक्रवार, दि. १० मे २०२४ रोजी निकाल दिला. या प्रकरणातील पाच आरोपींपैकी सचिन अंदुरे, शरद कळसकर या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर आरोपी विरेंद्र तावडे, अ‍ॅड. संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली. दाभोलकर यांची २०१३ मध्ये पुण्यात हत्या झाली होती. त्यांच्या हत्येला पावणे अकरा वर्ष उलटली आहेत.
अंनिसचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात दिवसाढवळ््या गोळ््या झाडून हत्या करण्यात आली होती. ओमकारेश्वर पुलावर त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात एकूण ५ आरोपी होते. सचिन अंदुरे, शरद कळसकर या दोघांनी दाभोलकरांवर गोळ््या झाडल्या होत्या. दोन्ही हल्लेखोरांना न्यायालयाने दोषी ठरवले असून, त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.डॉ. विरेंद्र तावडे, अ‍ॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या तिघांवर दाभोलकरांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होता. पण त्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. त्यांच्या विरोधात पुरावे नसल्याचे न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट केले. 
दाभोलकरांच्या हत्येला नऊ वर्षे उलटल्यानंतर १५ सप्टेंबर २०२१ रोजी पुण्याच्या विशेष न्यायालयाने डॉ. विरेंद्र तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच आरोपींवर आरोप निश्चित केले होते. या पाचही आरोपींनी गुन्हा कबूल करण्यास नकार दिला. त्यामुळे विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू झाली. न्यायाधीश नावंदर यांच्या बदलीनंतर विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. या खटल्यात ‘सीबीआय’तर्फे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी २० साक्षीदारांची साक्ष नोंदवली तर बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. प्रकाश साळशिंगीकर, अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अ‍ॅड. सुवर्णा आव्हाड यांनी दोन साक्षीदारांची साक्ष नोंदवत सरकार पक्षाच्या साक्षीदारांची उलटतपासणी नोंदवली.


डॉ. दाभोलकर खून 
खटला घटनाक्रम
-२० ऑगस्ट २०१३ : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या.
-मे २०१४ : पुणे पोलिसांकडून सीबीआयकडे तपास
-जून २०१६ : सीबीआयकडून दोन वर्षांनी डॉ. वीरेंद्रसिंह तावडेला अटक
-सप्टेंबर २०१६ : डॉ. वीरेंद्रसिंह तावडेवर हत्या आणि हत्येचे षडयंत्र रचल्या प्रकरणी आरोपपत्र दाखल
-ऑगस्ट २०१८ : महाराष्ट्र एटीएसकडून वैभव राऊत आणि शरद कळसकरला अटक
-मे २०१९ : वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला हत्येप्रकरणी सीबीआयकडून अटक
-सप्टेंबर २०१९ : सनातन संस्थेशी संबंधित सारंग आकोलकर आणि विनय पवार यांची नावे दोषारोपपत्रातून वगळली
-सप्टेंबर २०२१ : डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद काळस्कर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्याविरोधात दोषारोप निश्चित
-२०२१ मध्ये आरोपींविरोधात खटला सुरू
-१० मे २०२४ : डॉ. दाभोलकर खटल्याचा निकाल