राज्यात ५३.७० टक्के मतदान, मतदारांत निरुत्साह असल्याने चिंता
मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणूक २०२४ च्या दुस-या टप्प्यासाठी आज २६ एप्रिल रोजी मतदान पार पडले. या टप्प्यात देशातील १३ राज्यातील ८८ लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. ज्यात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि केरळ आदी राज्यांचा समावेश होता. त्रिपुरातील एका जागेवर सर्वाधिक ६६.९७ टक्के मतदान झाले. महाराष्ट्रातील ८ जागांवर ५३.७० टक्के इतके कमी मतदान झाले. देशात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात झाल्याने सर्वच राजकीय पक्षांची विशेषत: सत्ताधारी पक्षाची चिंता वाढली आहे.
मागच्या तुलनेत दुस-या टप्प्यातही मतदानाची टक्केवारी घसरल्याने चिंता वाढली आहे. एकीकडे मतदान वाढविण्यासाठी जागृती होत असताना मतदारांमध्ये अजूनही उदासीनता असल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यात शुक्रवारी १३ राज्यांमधील ८९ मतदारसंघांत मतदान झाले. यात महाराष्ट्रातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या ८ मतदारसंघांचा समावेश होता. सायंकाळी ५ वाजेपर्यंत या मतदारसंघांत सरासरी ५३.७० टक्के मतदान झाले असून दिग्गजांसह २०४ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात भवितव्य बंद झाले आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघात ६५ टक्के, बुलडाणा मतदारसंघात ५२.२४ टक्के मतदान झाले आहे. यवतमाळ-वाशिम मतदारसंघात ५४.०४ टक्के तर वर्धा लोकसभा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ५६.६६ टक्के मतदान झाले होते. अत्यंत चुरशीची निवडणूक होत असलेल्या अमरावतीत ५४.५० टक्के मतदान झाले होते. अकोला लोकसभा मतदारसंघात ५२.४९ टक्के, हिंगोली मतदारसंघात ५२.०३ टक्के तर परभणी लोकसभा मतदारसंघात ६१ टक्के मतदान झाले.