तिसऱ्या टप्प्यातही चुरस

yongistan
By - YNG ONLINE
२ कोटी ९ लाख मतदार, २५८ उमेदवार रिंगणात

मुंबई : प्रतिनिधी 
लोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यात देशातील ९४ व राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघात मंगळवार, दि. ७ मे २०२४ रोजी मतदान होत असून, सर्वच मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत होत आहे. बारामतीत सुप्रिया सुळे व सुुनेत्रा पवार यांच्यातील लढतीत लोक कोणाला कौल देणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. कोल्हापूरमध्ये शाहू महाराजविरुद्ध संजय मंडलिक, साता-यात उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे, सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघात केंद्रीय मंत्री नारायण राणेविरुद्ध विनायक राऊत लढत आहे. लातूर व  धाराशिवमध्येही अत्यंत चुरशीची लढत आहे. या तिस-या टप्प्यात राज्यातील २ कोटी ९ लाख मतदार २५८ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला करणार आहेत. 
लोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यात उद्या बारामती, रायगड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघात मतदान होणार आहे. २०१९ च्या निवडणुकीत यातील ८ जागा महायुतीला तर तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या होत्या. मागील दोन वर्षात राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत फूट पडली आहे. दोन्ही पक्षांचा मोठा गट भाजपासोबत महायुतीत गेला आहे तर उद्धव ठाकरेंची शिवसेना महाआघाडीत आली आहे. यामुळे आजमितीला महायुतीसोबत सात खासदार आहेत, तर चार खासदार महाविकास आघाडीत आहेत. यावेळी सर्व ११ मतदारसंघात अत्यंत चुरशीची निवडणूक होत असून, सात जागा टिकवण्याचे मोठे आव्हान महायुतीसमोर आहे. 
तिस-या टप्प्यात एकूण २ कोटी ९ लाख मतदार २५८ उमेदवारांचे भवितव्य उद्या मतदानयंत्रात बंद करणार आहेत. मतदानासाठी सुमारे २३ हजार मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. ११ मतदारसंघात ११४ मतदान केंद्रे संवेदनशील असून यापैकी सातारा लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ४० मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. बारामती लोकसभा मतदासंघात तीन तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल. पहिल्या दोन टप्प्यात कमी मतदान  झाल्याने तिस-या टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे. मतदारांना  उन्हाच्या झळांचा त्रास सुस  व्हावा म्हणून निवडणूक आयोगाने मतदान केंद्राच्या ठिकाणी विविध उपाययोजना केल्या आहेत. मतदानाची वेळ संध्याकाळी सहा वाजता संपत असली तरी सहावाजेपर्यंत मतदारांसाठी रांगेत उभे असलेल्या मतदाराला त्याचा हक्क बजावता येणार आहे.

सर्वच मतदारसंघात 
काटे की टक्कर 
तिस-या टप्प्यातील सर्वच ११ मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत होत असून, सर्वाधिक चर्चा आहे ती बारामतीतील नणंद-भावजयीच्या लढतीची. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पवार कुटुंबातही फूट पडली. शरद पवार यांच्या कन्या, विद्यमान खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुप्रिया सुळे मैदानात उतरल्या आहेत. शरद पवार आणि अजित पवार या दोघांसाठीही ही लढाई प्रतिष्ठेची आहे. अजित पवार यांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीनेही ही निवडणूक महत्वाची असल्याने त्यांनी आपली सगळी ताकद पणाला लावली आहे. 

मतदानाचा टक्का वाढविण्याचा प्रयत्न
राज्यात आतापर्यंत २ टप्प्यातील मतदान झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील ४ जिल्ह्यांमध्ये मतदानाची टक्केवारी घटलेली आहे. मतदान केंद्रावरील गैरसोयीचा परिणाम टक्केवारीवर होऊ नये म्हणून सर्व स्थरावरील प्रशासन सज्ज झाले आहे. यात प्रत्येक मतदान केंद्रांवर पिण्यासाठी थंड पाणी, सावलीसाठी ७८९ केंद्रावर पेंडॉल, केंद्रावरील खोल्यांमध्ये पंखा बसण्यासाठी खुर्च्या अशा प्रकारे सर्व सुसज्ज सुविधा उपलब्ध करुन मतदानाचा टक्का वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. 

या मतदारसंघांत आज मतदान
लातूर, धाराशिव, सोलापूर, माढा, सातारा, बारामती, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग