इंडिया आघाडीचा दणका, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात मोठा धक्का
नवी दिल्ली : देशात १९ एप्रिल ते १ जून या दरम्यान ७ टप्प्यांत पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी दि. ४ जून २०२४ रोजी पार पडली. या निवडणुकीत साडेतीनशेपेक्षा जास्त जागा जिंकून पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयाची हॅट्ट्रिक करतील, असा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला होता. परंतु उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, पंजाब, हरियाणा, राजस्थानमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आणि एनडीएचे गणितच बिघडले. एनडीएने एकूण ५४३ पैकी २९३ जागा जिंकत बहुमताचा आकडा पार केला. २०१९ मध्ये एनडीएला ३५३ जागा मिळाल्या होत्या. त्याचवेळी इंडिया आघाडीने तोडीस तोड लढत देत २३४ जागांपर्यंत मजल मारली. त्यामुळे बहुमताची फिगर गाठण्यासाठी भाजपप्रणित एनडीएची दमछाक झाली. एकट्या भाजपला २४१ जागांवरच समाधान मानावे लागले तर कॉंग्रेसला ९९ जागा मिळाल्या. त्यात सांगलीचे विशाल पाटील यांनी कॉंग्रेसला पाठिंबा दिल्याने त्यांनी शतक पूर्ण केले. त्यामुळे विरोधी पक्षाचीही ताकद वाढली आहे.
गेल्या १९ एप्रिलपासून सुरू असलेल्या रणसंग्रामाची अखेर १ जूनला झाली. त्यानंतर ४ जूनला मतमोजणी झाली. या निवडणुकीत एनडीएला काठावरचे बहुमत मिळाले असले तरी भाजपला मोठा धक्का बसला. निवडणुकीत गेल्या १० वर्षातील कामाच्या जोरावर ३७० जागा मागणा-या भाजपला २५० जागादेखील मिळाल्या नाहीत. तब्बल ४४१ जागा लढविणा-या भाजपला २४१ जागा जिंकता आल्या. बहुमतासाठी २७२ जागांची गरज आहे. त्यामुळे भाजपला आता मित्र पक्षांचे पाठबळ टिकवावे लागणार आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजपला ३०३ तर एनडीएला ३५३ जागा मिळाल्या होत्या तर २०१४ मध्ये भाजपने २८२ जागांवर बाजी मारली होती.
मित्र पक्षांची हवी साथ
तिस-यांदा सरकार स्थापन करताना मित्र पक्षांची गरज पडली. त्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (१२ जागा) आणि आंध्रचे टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू (१६) जागा, लोक जनशक्ती पार्टीचे चिराग पासवान (५ जागा), शिंदे गटाच्या ७ जागा यांचा टेकू लागणार आहे. कारण या चौघांच्या मिळून एकूण ४० जागा होतात.
इंडिया आघाडीचे यश
विरोधकांच्या इंडिया आघाडीला यावेळी चांगले यश मिळाले. यात काँग्रेसला ९९ जागा मिळाल्या. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून केवळ १ जागा असताना यावेळी १३ जागांवर विजय मिळाला. २०१९ मध्ये काँग्रेसने ५२ जागा तर त्याआधी २०१४ साली ४४ जागा जिंकल्या होत्या. तिस-या क्रमांकावर सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष समाजवादी पार्टी ठरला. त्यांना ३७ जागा मिळाल्या. तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये २९ जागा जिंकल्या. डीएमके आघाडीने ३९, शिवसेना उद्धव ठाकरे गटाने ९, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने ८ जागांवर विजय मिळवला.
यूपीत इंडियाचा ४३ जागांवर विजय
उत्तर प्रदेश भाजपचा गड मानला जातो. या राज्यात लोकसभेच्या सर्वाधिक ८० जागा आहेत. यावरच राष्ट्रीय नेतृत्वाचे गणित ठरते. यावेळी या राज्यात इंडिया आघाडीने ४३ जागांवर बाजी मारली, तर भाजपला ३६ जागांवर समाधान मानावे लागले. उत्तर प्रदेशात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी माजी मंत्री मनेका गांधी यांच्यासह ब-याच केंद्रीय मंत्र्यांचा पराभव झाला.
दिल्लीसह मध्य प्रदेश,
बिहारमध्ये भाजपची बाजी
भाजपने राजधानी दिल्लीसह मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, उत्तराखंड, झारखंड, ओडिशासह इतर राज्यांत एकतर्फी विजय मिळविला. भाजपने या राज्यांत जोरदार मुसंडी मारल्यामुळेच मित्रपक्षांच्या मदतीने बहुमताचा आकडा गाठता आला.
लोकसभा निकाल
एकूण जागा ५४३
एनडीए : २९३
इंडिया आघाडी : २३४
इतर : १६