अमित शाह यांच्याकडे गृह, चौहान यांच्याकडे कृषी खाते

yongistan
By - YNG ONLINE


निर्मला सीतारामनकडे अर्थ, राजनाथसिंगांकडे संरक्षण, पियूष गोयलांकडे वाणिज्य खात्याची जबाबदारी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिस-यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. मोदी ३.० मध्ये गेल्या सरकारमधील अनेक चेह-यांसोबत नव्या चेह-यांना संधी दिली. त्यानंतर आज लगेचच खातेवाटप करण्यात आले. एनडीए सरकार असल्याने प्रमुख खात्यांत काय बदल होणार का, याची उत्सुकता होती. परंतु बरीच महत्त्वाची खाती मागील सरकारमधील नेत्यांनाच मिळाली आहेत. त्यामध्ये गृह खाते अमित शाह, संरक्षण खाते राजनाथिसंग यांच्याकडे, रस्ते वाहतूक गडकरी, परराष्ट्र खाते एस. जयशंकर, अर्थखाते निर्मला सीतारामन आणि वाणिज्य खाते पियूष गोयल यांच्याकडेच सोपविण्यात आले. तसेच अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे मंत्रालय कायम आहे.

मागील मंत्रिमंडळात अमित शाह, राजनाथ सिंग, निर्मला सीतारामन, एस. जयशंकर, पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, अश्विनी वैष्णव, गजेंद्रसिंग शेखावत आणि हरदीपसिंग पुरी या ज्येष्ठ सदस्यांना पुन्हा संधी मिळाली आणि मागील सरकारमध्ये ज्यांनी जे खाते सांभाळली, जवळपास तीच खाती त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. यासोबतच शिवराजसिंह चौहान यांच्याकडे महत्त्वाचे असलेले कृषि खाते सोपविले आहे. तसेच जितनराम मांझी यांच्याकडे सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालय, अन्नपूर्णा देवी यांच्याकडे महिला व बाल विकास, भुपेंद्र यादव यांच्याकडे पर्यावरण, जे. पी. नड्डा यांच्याकडे आरोग्य, सी. आर. पाटील यांच्याकडे जलशक्ती, किरण रिजीजू यांच्याकडे संसदीय कामकाज तर धर्मेंद प्रधान यांच्याकडे मनुष्यबळ विकास खाते (शिक्षण) सोपविण्यात आले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ७१ मंत्र्यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. यामध्ये ३० कॅबिनेट, ५ विशेष राज्यमंत्री आणि ३६ राज्यमंत्र्यांचा समावेश होता. मंत्र्यांच्या शपथविधीनंतर आज त्यांचे खातेवाटप झाले. सरकार एनडीएचे असले तरी भाजपने महत्त्वाची खाती आपल्याकडेच ठेवली आहेत. मित्र पक्षांच्या अनेक नेत्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले. परंतु खाते दुय्यम दर्जाचे दिले आहेत. मात्र, अनेकांना कॅबिनेट मंत्रिपदाची लॉटरी लागल्याने मित्रपक्षांत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या मंत्रिमंडळात शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांना राज्यमंत्रिपद स्वतंत्र पदभार देण्यात आले आहे. मात्र, यावरून शिवसेनेतील नाराजी समोर आली आहे.

वीरेंद्र कुमार यांच्याकडे सामाजिक न्याय, राम मोहन नायडू यांच्याकडे विमान वाहतूक, प्रल्हाद जोशींकडे ग्राहक व्यवहार, जुएल ओराम यांच्याकडे आदिवासी विकास, गिरीराज सिंह यांच्याकडे वस्त्र, अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे आणि माहिती, प्रसारण मंत्रालय, गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे पर्यटन, हरदीपसिंग पुरी यांच्याकडे पुन्हा पेट्रोलियम खाते दिले आहे. याशिवाय मनसुख मांडविया यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण, चिराग पासवान यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग, जी. किशन रेड्डी यांच्याकडे कोळसा वा खान मंत्रालय देण्यात आले आहे. 

महाराष्ट्रातील मंत्री व खाते

नितीन गडकरी : रस्ते वाहतूक
पियूष गोयल : वाणिज्य
प्रतापराव जाधव : आयुष, आरोग्य
रामदास आठवले : सामाजिक न्याय
मुरलीधर मोहोळ : सहकार, नागरी विमान वाहतूक
रक्षा खडसे : क्रीडा