मांझी ओडिशाचे मुख्यमंत्री

yongistan
By - YNG ONLINE
भुवनेश्वर : प्रतिनिधी 
ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदी मोहन मांझी यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाले. मोहन मांझी हे बुधवार, दि. १२ जून २०२४ रोजी मु्ख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. केवी सिंह देव आणि प्रवती परिदा हे दोघेजण उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.  केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी मोहन मांझी यांच्या नावाची घोषणा केली. 

मोहन मांझी हे ओडिशातील केओंधार विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यांनी बिजू जनता दलाचे मीन मांझी यांचा पराभव केला. मोहन मांझी यांनी ११,५७७ मतांनी विजय मिळवला. भाजपने ओडिशामध्ये पहिल्यांदाच सत्ता प्राप्त केली. भाजपने ओडिशात १४७ जागांपैकी ७८ जागा पटकावल्या तर बिजू जनता दलाला ५१ जागांवर समाधान मानावे लागले. बिजू जनता दलाच्या २४ वर्षांची सत्ता यंदा भाजपने मोडीत काढली.

लोकसभेतही भाजपला यश
त्याचसोबत लोकसभा निवडणुकीतही भाजपने मोठे यश मिळवले. भाजपने राज्यातील २१ पैकी २० जागा पटकावल्या तर काँग्रेसला एक जागा मिळाली. बिजू जनता दलाला एकही जागा मिळाली नाही.