आघाडी ३०, महायुती १७, अपक्ष १
मुंबई : प्रतिनिधी
‘चारसो पार’चा नारा देऊन लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला केंद्रात कसेबसे निसटते बहुमत मिळाले असले तरी महाराष्ट्रात मात्र महायुतीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. १ जून २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा पार पडल्यानंतर ४ जून रोजी मतमोजणी झाली. यात भाजपा, शिंदे सेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ १७ जागा मिळाल्या असून ३० जागा जिंकत महाविकास आघाडीने दणदणीत यश मिळवले. काँग्रेसला १७, ठाकरे सेनेला ९ तर केवळ १० जागा लढणा-या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ८ जागांवर विजय मिळाला. २०१९ च्या निवडणुकीत ४१ जागा जिंकणा-या महायुतीला केवळ १७ जागा मिळाल्या आहेत. भाजपाला सर्वाधिक फटका बसला असून त्यांचे २३ चे संख्याबळ ९ वर आले. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ६ पैकी ४ मंत्र्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले असून सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हेही पराभूत झाले. शिंदेंच्या शिवसेनेला ७ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ १ जागा मिळाली. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केल्याने अजित पवार यांना मोठा धक्का बसला.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडून व २ पक्ष फोडून सत्तेवर आलेल्या महायुतीने निवडणुकीपूर्वी ४५ पारचा नारा दिला होता; पण महाविकास आघाडीने दिलेल्या कडव्या लढतीमुळे ही निवडणूक चुरशीची झाली होती. तोडफोडीच्या तत्त्वशून्य राजकारणाबद्दल लोकांमध्ये असलेली नाराजी, आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाजात असलेला असंतोष, दुटप्पी धोरणामुळे दुखावलेले ओबीसी, राज्यघटना बदलण्याच्या वक्तव्यांमुळे दलित, शोषित समाजात असलेली अस्वस्थता, अल्पसंख्याक मतांचे ध्रुवीकरण यामुळे सत्ताधारी महायुतीला महाराष्ट्रात फटका बसला.
पंतप्रधानांच्या १८ सभा
सत्ताधारी युतीला सगळी शक्ती पणाला लावून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ सभा घेऊनही मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे मोदींना खूप मोठा धक्का बसला. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात संख्याबळ घटल्याने भाजपला बहुमताचादेखील आकडा गाठता आला नाही.
जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा फटका
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या आंदोलनाचा मोठा फटका महायुतीला बसला आहे. मराठवाड्यातील ८ पैकी ६ जागा जिंकत महाआघाडीने दणदणीत यश मिळवले आहे.
काँग्रेस नंबर वन, विदर्भात भाजपाला धक्का
मागच्या निवडणुकीत काँग्रेसला राज्यात केवळ १ जागा मिळाली होती. या वेळी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत सर्वाधिक १३ जागा जिंकल्या. विदर्भात गडचिरोली, चंद्रपूर, रामटेकसह ५ जागा तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने व राष्ट्रवादीने प्रत्येकी एका जागेवर यश मिळवले.