जम्बो मंत्रिमंडळ, ३० कॅबिनेटसह ७२ जणांना पद व गोपनीयतेची शपथ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नरेंद्र मोदी यांनी रविवार, दि. ९ जून २०२४ रोजी सायंकाळी तिस-यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि हॅट्ट्रिक साधत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची बरोबरी साधली. यावेळी मोदींसोबत ३० कॅबिनेट, ५ स्वतंत्र पदभार आणि ३६ राज्यमंत्री अशा एकूण ७२ जणांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनासमोर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. राज्यात शिंदे गटाला प्रताप जाधव यांना स्वतंत्र पदभारचे राज्यमंत्रिपद मिळाले. यासोबत रिपाइं नेते रामदास आठवले यांना पुन्हा लॉटरी लागली तर भाजपच्या रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ या नव्या चेह-यांनाही संधी मिळाली. मात्र, राष्ट्रवादी अजित पवार गटाला मंत्रिपद मिळाले नाही.
२०२४ च्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले नसल्याने आता जदयू, टीडीपी, शिवसेना शिंदे गट, अजित पवार गट, चिराग पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष यांच्यासह इतर पक्षांच्या मदतीने एनडीए सरकार सत्तेवर आले. या सरकारच्या शपथविधी सोहळ््यात पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यानंतर राजनाथसिंग, अमित शाह, नितीन गडकरी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलीे. भाजपकडून विद्यमान मंत्री असलेल्या २० दिग्गजांना वगळण्यात आले. मात्र, आज भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, पियूष गोयल, निर्मला सीतारामन, एस. जयशंकर, धर्मेंद्र प्रधान, सर्वानंद सोनोवाल, अश्विनी वैष्णव, ज्योतिरादित्य शिंदे, भुपेंद्र यादव, गिरीराज सिंह, किरेन रिजीजू, हरदीपसिंग पुरी, मनसुख मांडविया यांच्यासह माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, मनोहरलाल खट्टर यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यासोबतच जितनराम मांझी, एच. डी. कुमारस्वामी, जी. किशन रेड्डी, चिराग पासवान, सी. आर. पाटील, अन्नपूर्णा देवी, गजेंद्रसिंह शेखावत यांनाही कॅबिनेट मंत्रिपद मिळाले.
मोदी पर्वातील तिस-या मंत्रिमंडळात पूर्वीप्रमाणे मोदींचा प्रभाव दिसत नसला तरी मंत्रिमंडळाची पूर्ण रचना पाहता पंतप्रधान मोदी यांचा प्रभाव राहील, हे स्पष्ट आहे. या मंत्रिमंडळात भाजपला ६० मंत्रिपदे, तर जदयू, टीडीपी, लोजपाला प्रत्येकी २ आणि इतर मित्रपक्षांना प्रत्येकी एक मंत्रिपद देण्यात आले. प्रादेशिक समतोल साधताना मंत्रिमंडळात उत्तर प्रदेशला ८, बिहारमध्ये भाजप, जदयू, लोजपा मिळून ८ मंत्रिपदे, ईशान्येकडील आसाम, अरुणाचलला मंत्रिमंडळात संधी मिळाली. महाराष्ट्रालाही मागच्या मंत्रिमंडळात ८ पदे होती. यावेळी ६ मंत्रिपदे मिळाली. हरियाणात मनोहरलाल खट्टर, इंद्रजित सिंह यांच्या रूपाने २ मंत्रिपदे, झारखंडमध्ये संजय सेठ, चंद्रशेखर चौधरी, अन्नपूर्णा देवी यांना संधी मिळाली. दिल्लीत पूर्व दिल्लीचे हर्ष मल्होत्रा यांना मंत्रिपद मिळाले.
महाराष्ट्राला ६ मंत्रिपदे
महाराष्ट्रातही भाजपने नितीन गडकरी, पियूष गोयल यांच्यासारख्या बड्या नेत्यांना कॅबिनेट मंत्रिपद देतानाच शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांना राज्यमंत्रिपदाचा स्वतंत्र पदभार दिला आहे. तसेच राज्यमंत्री म्हणून रामदास आठवले, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांना संधी देण्यात आली आहे.
२० विद्यमान मंत्र्यांचा पत्ता कट
स्मृती इराणी, अनुराग ठाकूर, राजीव चंद्रशेखर, अजय मिश्रा टेनी, जनरल व्ही. के. सिंह आणि अश्विनी चौबे, अजय भट्ट, साध्वी निरंजन ज्योती, मीनाक्षी लेखी, राजकुमार रंजन सिंह, आर. के. सिंह, अर्जुन मुंडा, निशीथ प्रामाणिक, सुभाष सरकार, जॉन बारला, भारती पवार, रावसाहेब दानवे, कपिल पाटील, नारायण राणे, भागवत कराड या माजी मंत्र्यांना डच्चू मिळाला.
अजित पवार गटाला वगळले
राष्ट्रवादी अजित पवार गटाला मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही. अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. भाजपने राज्यमंत्री स्वतंत्र पदभारची ऑफर दिली होती. परंतु प्रफुल्ल पटेल कॅबिनेटमंत्री राहिल्याने त्यांनी राज्यमंत्रीपद नाकारले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.