ॶॅब्रोस, रुवकोन यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल

yongistan
By - YNG ONLINE
स्टॉकहोम : जगातील सर्वात प्रतिष्ठेच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून,२०२४ सालातील वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार व्हिक्टर अ‍ॅब्रोस आणि गॅरी रुवकुन या दोघांना मायक्रोआरएनएच्या शोधासाठी जाहीर झाला. स्टॉकहोमच्या कारोलिंस्का इस्टिट्यूटमधील नोबेल असेंबली येथे याची घोषणा करण्यात आली.
व्हिक्टर अ‍ॅब्रोस आणि गॅरी रुवकुन यांनी मायक्रोआरएनएचा शोध लावला आणि ट्रांसक्रिप्शननंतर जीन एक्स्प्रेशनला रेगुलेट करण्यात महत्त्वाचे योगदान दिले. या दोघांच्या शोधामुळे सजीवांचा विकास आणि कार्य करण्याच्या पद्धतीबद्दल महत्त्वाचे संशोधन झाले आहे.
आपल्या गुणसूत्रांमध्ये संग्रहित केलेली माहिती आपल्या शरीरातील सर्व पेशींसाठी एक सूचना मॅन्युअलसारखी आहे. प्रत्येक पेशीत एकसारखी गुणसूत्रे असतात. त्यामुळे प्रत्येक पेशीत अचूक समान जीन आणि सूचना असतात. तरीसुद्धा स्रायू आणि तंत्रिका पेशींसारख्या भिन्न पेशी प्रकारांमध्ये अतिशय वेगळी वैशिष्ट्ये असतात. हे फरक कसे निर्माण होतात, याचे उत्तर जीन रेग्युलेशनमध्ये आहे, जे प्रत्येक पेशीला फक्त संबंधित सूचना निवडण्याची परवानगी देते. यामुळे प्रत्येक पेशी प्रकारात फक्त योग्य जीन सक्रिय असतात,नोबेल पुरस्कार समितीने त्यांच्या  पोस्टमध्ये म्हटले आहे.
व्हिक्टर अ‍ॅब्रोस यांचा जन्म १९५३ मध्ये अमेरिकेतील न्यू हॅम्पशायर येथे झाला. त्यांनी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), केंब्रिज येथून पीएचडी मिळवली. अ‍ॅब्रोस यांनी १९७९-१९८५ मध्ये पोस्टडॉक्टोरल संशोधन केले. गॅरी रुवकुन यांचा जन्म १९५२ साली कॅलिफोर्नियातील बर्कले येथे झाला. त्यांनी १९८२-१९८५ मध्ये मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथे पोस्टडॉक्टोरल फेलो म्हणून काम केले.