इराणचा इस्रायलवर हल्ला, कच्चे तेल भडकणार

yongistan
By - YNG ONLINE
तेल अविव : मागच्या वर्षभरापासून इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षात मंगळवार, दि. १ ऑक्टोबर २०२४ रोजी इराणने उडी घेतली. इस्रायलने वर्षभरापासून  सुरू असलेल्या युद्धात सुरुवातीला हमास आणि मागच्या पंधरवड्यात हिजबुल्लाह या संघटनांना लक्ष्य करून त्यांचे कंबरडे मोडले होते. दरम्यान, इराणचे समर्थन असलेल्या हिजबुल्लाहच्या प्रमुखाला इस्रायलने ठार मारल्यानंतर खवळलेल्या इराणने आज इस्रायलला लक्ष्य करीत शेकडो क्षेपणास्त्र डागली. 
या हल्ल्यानंतर संपूर्ण इस्रायलमध्ये आपत्कालीन सायरन वाजू लागले. तसेच इस्रायली सैन्याने अलर्ट जारी करीत मध्य आणि दक्षिण इस्रायलमधील नागरिकांना सुरक्षेसाठी बंकरमध्ये आश्रय घेण्यास सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार इराणकडून १०० पेक्षा अधिक बॅलेस्टीक क्षेपणास्त्रांद्वारे इस्रायलवर हल्ला करण्यात आला. दरम्यान, इस्रायलच्या आयर्न डोमकडून इराणच्या क्षेपणास्त्रांचा प्रतिकार करण्यास सुरूवात केली आहे. हिजबुल्लाहचा प्रमुख नसराल्लाह याचा मृत्यू झाल्यापासून इस्रायलवर मोठा हल्ला होऊ शकतो, असे मानले जात होते. 

तेलाच्या किमती वाढल्या
इस्रायलने गेल्या काही दिवसांत लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाहचे मोठे नुकसान झाले. त्यातच हिजबुल्लाहचा नेता हसन नसरल्लाहच्या हत्येनंतर मध्य-पूर्वेत वाढलेल्या तणावामुळे तेलाच्या किमती भडकल्या आहेत.
मध्य-पूर्वेतील स्थितीमुळे 
भारताचे टेन्शन वाढले
भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे साधन मानले जाणारे कच्चे तेल केवळ ऊर्जेचा प्रमुख स्रोत नाही तर वाहतूक, उद्योग आणि कृषी यासारख्या विविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. भारत रशियासह अनेक देशांकडून कच्च्या तेलाची आयात करतो. रशियाकडून एकूण आयातीपैकी ३५% आयात सुरू केली असून इराक, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिकाही भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा करते. आता इराण युद्धात पडल्याने ओपेक उत्पादकांकडून पुरवठा खंडित होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.