भारत सरकार नवीन धोरण आणणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लेबनॉनमध्ये काही दिवसांपूर्वी पेजर आणि ऑकीटॉकीसह काही इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली होती. इलेक्ट्रॉनिक उपकरणाद्वारे झालेल्या या स्फोटामुळे अनेक देश अलर्ट झाले आहेत. या अनुषंगाने आता भारतही अलर्ट झाला असून भारतात चिनी सीसीटीव्ही कॅमे-यांबाबत नवीन धोरण आणण्याची शक्यता मंगळवार, दि. १ ऑक्टोबर २०२४ रोजी व्यक्त केली.
लेबनॉनमध्ये पेजर बॉम्बस्फोटानंतर भारत सरकार चीनच्या अशा उपकरणांवर अंकुश ठेवण्यासंदर्भात निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. भारत सरकार आता स्थानिक कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही नियमांची त्वरीत अंमलबजावणी करण्याची शक्यता आहे. लेबनॉनमधील पेजर स्फोटाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार आता अधिक लक्ष देऊन असणार आहे. केंद्र सरकारचा एक नवीन नियम ८ ऑक्टोबरपासून लागू होऊ शकतो. ज्यामुळे चिनी कॅमेरे भारतीय बाजारातून हळूहळू बंद होतील. याचा फायदा भारतीय कंपन्यांना होईल.
या पार्श्वभूमीवर भारत सरकार सीसीटीव्ही कॅमे-यांवरील मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीला गती देण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, काउंटरपॉइंट रिसर्चचे संशोधन विश्लेषक वरुण गुप्ता यांच्या मते, सध्या सीपी प्लस, हिकविजन आणि दाहुआ भारतातील ६० टक्यांपेक्षा जास्त बाजारपेठ नियंत्रित करतात. मात्र, स्थानिकीकरण सामग्री सुधारण्यासाठी अजून त्यांना प्रयत्न वाढवावे लागणार आहेत. सीपी प्लस ही भारतीय कंपनी आहे तर हिकव्हिजन आणि दाहुआ ही चीनची कंपनी आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये युनायटेड स्टेट्स सरकारने फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनमार्फत राष्ट्रीय सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हिकव्हिजन आणि दाहुआ या कंपन्यांवर बंदी घातली होती.