स्टॉकहोम : २०२४ चा शांततेचा नोबेल पुरस्कार जपानमधील निहोन हिडानक्यो या संघटनेला मिळाला आहे. नॉर्वेजियन नोबेल समितीने शुक्रवार, दि. ११ ऑक्टोबर २०२४ रोजी ही घोषणा केली. आण्विक शस्त्रांविरुद्ध दिर्घकाळ मोहिम चालवल्याबद्दल या संघटनेला यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात येत असल्याचे नोबेल समितीने म्हटले आहे. ही संघटना जग आण्विक शस्त्रांपासून मुक्त करण्यासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहे. जपानमधील ही संघटना अशा लोकांनी तयार केली आहे, जे दुस-या महायुद्धादरम्यान हिरोशिमा आणि नागासाकी येथे झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्यातून वाचले होते. या लोकांना हिबाकुशा असे म्हटले जाते.
निहोन हिडानक्यो संघटनेला पुरस्कार जाहीर करताना समितीने म्हटले आहे की, दुस-या महायुद्धा दरम्यान हिरोशिमा आणि नागासाकी येथे अणुबॉम्ब टाकण्यात आले होते. या हल्ल्यातून वाचलेल्या लोकांनी जग आण्विक शस्त्रांपासून मुक्त करण्यासाठी तळागाळात आंदोलन केले. या संघटनेने दिर्घ काळापासून केलेल्या प्रयत्नांना आणि कार्यासाठी शांततेचे नोबेल पुरस्कार मिळत आहे. या संघटनेचा प्रयत्न आहे की जगात पुन्हा अणुबॉम्बचा वापर पुन्हा केला जाऊ नये. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून या संस्थेला शांततेचे नोबेल जाहीर करण्यात आले.