हरहुन्नरी अभिनेता अतुल परचुरे यांचे निधन

yongistan
By - YNG ONLINE
मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा
मुंबई : प्रतिनिधी
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेते अतुल परचुरे यांचे सोमवार, दि. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी ५७ व्या वर्षी निधन झाले. काही महिन्यांपूर्वी कँसरसारख्या आजारातून बरे झाले होते. या कठीण काळात त्यांना वेगवेगळ््या अडचणींना सामोरे जावे लागले होते. पण त्यांनी जिद्द सोडली नव्हती. पण गेल्या २-३ दिवसांपासून ते रुग्णालयात होते. उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेविश्वार शोककळा पसरली आहे. नाटक, सिनेमा आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांवर अतुल परचुरे यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली होती.  एक हरहुन्नरी अभिनेता म्हणून त्यांनी कलाविश्वात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. 
अतुल परचुरे यांनी पु. ल. देशपांडे यांची व्यक्तिरेखा व्यक्ती आणि वल्लीमध्ये हुबेहुब साकारली होती. अतुल परचुरे यांचे नातीगोती हे नाटक चांगलेच गाजले. यावेळी त्यांच्याबरोबर दिलीप प्रभावळकर आणि रिमा लागू असे दिग्गज कलाकार होते. अनेक मराठी नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. वासूची सासू, प्रियतमा, तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्याचबरोबर अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सहअभिनेता म्हणूनही काम केले. सलाम-ए-इश्क, पार्टनर, ऑल द बेस्ट : फन बिगिन्स, खट्टा मीठा, बुढ्ढा होगा तेरा बाप अशा हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी स्वत:च्या अभिनयाची छाप पाडली. अलिबाबा आणि चाळीशीले चोर हा त्यांचा प्रदर्शित झालेला शेवटचा मराठी चित्रपट होता. याशिवाय जागो मोहन प्यारे मालिकेतील त्यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. पु. ल. देशपांडे यांनीही त्यांच्या अभिनयाचे कौतुक केले होते. असा महान अभिनेता आज काळाच्या पडद्याआड गेला.