झारखंडमध्ये झामुमो, महाराष्ट्रात महायुती

yongistan
By - YNG ONLINE

भाजप सर्वांत मोठा पक्ष, महाराष्ट्रात अविश्वसनीय निकाल 

महाराष्ट्रात २८८ पैकी २३६ जागा महायुतीला, महाविकास आघाडी ५० मध्ये गारद  
मुंबई/रांची : प्रतिनिधी/वृत्तसंस्था 
झारखंड आणि महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत झारखंडमध्ये झामुमो आणि कॉंग्रेस आघाडीने ८१ पैकी ५४ जागा जिंकत पुन्हा सत्ता राखण्यात यश मिळविले, तर महाराष्ट्रात महायुतीने जोरदार मुसंडी मारत २८८ पैकी २३६ जागांवर विजय मिळवित महाविकास आघाडीचा धुव्वा उडविला. भाजपाने १४९ पैकी तब्बल १३७ जागा जिंकल्या असून, शिंदे व अजितदादांच्या पक्षाला अनुक्रमे ५७ व ४१ जागा मिळाल्या. महाविकास आघाडीला अवघ्या ४९ जागा मिळाल्या. यात काँग्रेसला १५, शिवसेना (उद्धव ठाकरे) २० व शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अवघ्या १० जागा मिळाल्या असून, त्यांना विरोधी पक्षनेतेपदही मिळेल की नाही, अशी स्थिती आहे. या त्सुनामीत महाविकास आघाडीचे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, राजेश टोपे, बच्चू कडू, यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक मातब्बर नेते पराभूत झाले. भाजपाचे संख्याबळ वाढल्याने निवडणूक जिंकूनही आता एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, हा निकाल अविश्वसनीय असल्याची प्रतिक्रिया विरोधकांनी दिली. २० नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर झाला. 
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी आज झाली. चुरशीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याबाबत सर्वांनाच उत्कंठा होती. सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर भाजपा महायुतीने जी मुसंडी मारली, त्यात महाविकास आघाडी अक्षरश: नेस्तनाबूत झाली. या निवडणुकीत लोकसभेपेक्षा ७० लाख अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला  होता. हे अतिरिक्त मतदान कोणाच्या फायद्याचे ठरणार याबाबत तर्क वितर्क व्यक्त केले जात होते. त्याचे उत्तर  आज मिळाले. राज्यातील सर्वच भागात महायुतीच्या उमेदवारांनी पहिल्या फेरीपासूनच जोरदार आघाडी घेतली. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवातून धडा घेऊन सरकारने शेवटच्या ४ महिन्यांत घेतलेले निर्णय, प्रत्त्येक मतदारसंघात केलेले नियोजन, जातीय समीकरणाला छेद देण्यासाठी बटेंगे तो कटेंगेचा धार्मिक ध्रुवीकरण करणारा प्रचार व गेम चेंजर ठरलेली लाडकी बहीण योजना यामुळे निर्माण झालेल्या सुप्त लाटेने, महाविकास आघाडीवर केवळ मात केली नाही तर त्यांचे अभेद्य बालेकिल्लेही उद्ध्वस्त केले. शेतमालाचे कोसळलेले भाव, जरांगेंचे मराठा आंदोलन, पक्ष फोडीबद्दल लोकांमध्ये असलेली प्रतिकूल प्रतिक्रिया यातील कोणत्याही मुद्याचा प्रभाव महायुतीला अडचणीचा ठरला नाही. 

विदर्भ-मराठवाड्यात मुसंडी, 
सर्व विभागात मारली बाजी
लोकसभा निवडणुकीत विदर्भ व मराठवाड्यात महायुतीला मोठा धक्का बसला होता. विदर्भातील ६२ व ४६ जागांवर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा वरचष्मा राहील, असा अंदाज होता. पण महायुतीने विदर्भातील ६२ पैकी ४९ जागा जिंकल्या तर मराठवाड्यातील ४६ पैकी ४० जागा जिंकून महायुतीने सर्वांनाच चकित केले. मराठा आंदोलनाचा मोठा फटाका बसेल, हा अंदाज चुकीचा ठरला. उत्तर महाराष्ट्रात भाजपाचे वर्चस्व होते. पण लोकसभा निवडणुकीत धुळे, नंदुरबार, नगरच्या जागा जिंकून आघाडीने त्यांना धक्का दिला होता. पण येथे युतीने ४७ पैकी ४१ जागा जिंकल्या. आघाडीला विदर्भात १३, मराठवाड्यात ६ तर उत्तर महाराष्ट्रात केवळ ३ जागा मिळाल्या. पश्चिम महाराष्ट्रातील ५८ जागांपैकी महायुतीला ४५ जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीला ९ व अन्य पक्ष व अपक्षांना ४ जागा मिळाल्या. हीच स्थिती मुंबई व कोकणात राहिली. ठाणे व कोकणातील ३९ पैकी ३२ जागा युतीला तर ४ जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत. मुंबईतील ३६ पैकी २३ जागा महायुतीला, तर १२ जागा महविकास आघाडीला मिळाल्या आहेत.

मातब्बर नेत्यांना 
पराभवाचा धक्का
राज्य विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अनेक बड्या नेत्यांना पराभवाची धूळ चाटावी लागली. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पराभूत झाले. संगमनेरमध्ये शिवसेनेचे उमेदवार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा १० हजार ५६० मतांनी पराभव केला. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजपचे अतुल भोसले यांनी ४० हजार मतांनी पराभव केला. माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. भाजपच्या राजेश वानखेडे यांनी त्यांचा पराभव केला. लातूर ग्रामीणमधून धिरज देशमुख यांचाही पराभव झाला. याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. वसई विरारमधून बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर व त्यांचे चिरंजीव क्षितीज ठाकूर यांचा पराभव झाला. तसेच प्रहारचे बच्चू कडू यांचा भाजपचे प्रवीण तायडे यांनी पराभव केला.
मुंबईत महायुतीचा आवाज, 
ठाकरे गटाला ११ जागा
शिवसेनेच्या ऐतिहासिक फुटीनंतर मुंबईवर महायुतीने आपले राजकीय वर्चस्व राखले आहे. महायुतीत एकट्या भाजपला १५ तर शिवसेना शिंदे गटाला ५ जागा मिळाल्या आहेत तर मुंबईत लोकसभेच्या तीन जागा जिंकणा-या शिवेसना उद्धव ठाकरे गटाला ११ जागांवर समाधान मानावे लागले तर काँग्रेसला तीन,  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि समाजवादी पक्षाला  प्रत्येकी एक जागा मिळाली.  मुंबईत काँग्रेसची कामगिरी अत्यंत  निराशाजनक झाली आहे.