५० वे सरन्यायाधीश चंद्रचूड सेवानिवृत्त

yongistan
By - YNG ONLINE
नवी दिल्ली : वृत्तसंस्था 
न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड हे निवृत्त झाले आहेत. ८ नोव्हेंबर २०२२ रोजी देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतली होती. धनंजय चंद्रचूड यांचे वडील दिवंगत वाय. व्ही. चंद्रचूड हेदेखील देशाचे सरन्यायाधीश होते. वाय. व्ही. चंद्रचूड यांनी सात वर्षे देशाचे सरन्यायाधीश म्हणून न्यायदान केलेले आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी दोन वर्षांच्या कार्यकाळात तब्बल १,२७५ खंडपीठाच्या सुनावणीत सहभाग घेतला. ६१३ निकालांचे लिखाण त्यांनी केले, तर ५०० खटल्यांमध्ये ते स्वत: न्यायमूर्ती होते, अशी माहिती सुप्रीम कोर्ट ऑब्जर्व्हर या संकेतस्थळावर मिळते. धनंजय चंद्रचूड यांच्या काळात सर्वोच्च न्यायालयात डिजिटायजेशनला वेग आला. न्यायप्रक्रिया अधिक युझर फ्रेंडली झाली. निवृत्त होताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या संग्रहालयाचे उद्घाटन केले. 

धनंजय चंद्रचूड यांच्याविषयी थोडक्यात माहिती
न्या. धनंजय चंद्रचूड यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९५९ रोजी झाला. त्यांचे वडील वाय. व्ही. चंद्रचूड हे भारताचे १६ वे सरन्यायाधीश होते. त्यांची आई प्रभा चंद्रचूड या ऑल इंडिया रेडिओच्या गायिका होत्या. चंद्रचूड यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्र आणि गणित या विषयात पदवी प्रदान केली होती, तर १९८२ रोजी त्यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. १९८३ साली त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून एलएलएमची पदवी घेतली, तर हार्वर्ड विद्यापीठातूनच त्यांनी ज्युरीडिकल सायन्सेसची डॉक्टरेट मिळविली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रमध्ये वकील म्हणून प्रवेश घेतला.