घराणेशाहीतील ८९ उमेदवारांना मिळाली आमदारकीची संधी
मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत घराणेशाहीचा मुद्दा प्रकर्षणाने समोर येतो. सर्वच राजकीय पक्षांमध्ये घराणेशाहीचा डंका वाजताना पाहायला मिळतो. काँग्रेस असो किंवा भाजप, राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना सर्वच राजकीय नेत्यांच्या वारसदार, पुढची पिढी, युवा नेते बनून राजकारणात एन्ट्री करतात. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये हीच घराणेशाही प्रकर्षणाने दिसून आली. राज्यातील २८८ मतदारसंघांपैकी २३७ मतदारसंघात घराणेशाहीतून पुढे आलेले उमेदवार उभे असल्याचे चित्र दिसून आले. त्यामध्ये सर्वाधिक उमेदवार हे भाजपने दिले होते. पण दोन राष्ट्रवादी एकत्र केल्यास घराणेशाहीतील सर्वाधिक उमेदवार हे पवारांच्या राष्ट्रवादीनेच उभे केल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्राचे राजकारण पाहिल्यास पवार, ठाकरे, थोरात, देशमुख, मुंडे, शिंदे, फडणवीस या बड्या नेत्यांनाही राजकीय वारसा किंवा त्यांचा वारसा पुढे नेणारे कुटुंबातील सदस्य असल्याचे दिसून येते. बारामतीमधील पवार कुटुंबात मोठा राजकीय वारसा असून तीन पिढ्यांपासून त्यांची घराणेशाही दिसून येते. त्याचप्रमाणे ठाकरे, मुंडे, देशमुख यांसह राज्यातील बहुतांश मतदारसंघात घराणेशाहीचा बोलबाला असल्याचे चित्र आहे. पण या २३७ उमेदवारांपैकी केवल ८९ उमेदवारांनाच जनतेने निवडणून दिले.
सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय अभ्यासक हेरंब कुलकर्णी यांनी याबाबतचा एक अहवाल समोर आणला आहे. त्यानुसार घराणेशाहीतील २३७ उमेदवारांपैकी ८९ उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपने तिकीट दिलेल्या उमेदवारांपैकी ३२ टक्के उमेदवार हे घराणेशाहीशी निगडीत आहेत.
घराणेशाहीतील उमेदवार
काँग्रेस : ४२
राष्ट्रवादी शप : ३९
शिवसेना ठाकरे : १९
भाजप : ४९
राष्ट्रवादी अप : २६
शिवसेना शिंदे : १९
इतर : ४३
लोकसभा निवडणुकीत घराणेशाहीचे उमेदवार
विधानसभेप्रमाणेच लोकसभा निवडणुकीतही घराणेशाही पाहायला मिळाली. राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी ३६ जागांवर राजकीय घराणेशाहीतील उमेदवार उभे राहिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे घराणेशाही किती खोलपर्यंत पक्षात आणि जनतेतही रुजली आहे हे दिसून येते.
काँग्रेस : ७
राष्ट्रवादी शप : ३
शिवसेना ठाकरे : ६
भाजप : १४
राष्ट्रवादीअप : १
शिवसेना : ५