राक्षसी बहुमत अनाकलनीय

yongistan
By - YNG ONLINE
२० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रात राज्य विधानसभेच्या निवडणुका झाल्या. महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी ही लढत होती. आघाडी आणि महायुतीत अनेक पक्ष असल्याने बंडखोरी अटळ होती. दोन्ही बाजूंनीही बंडखोरीला उधाण आले. त्यामुळे बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार, याचा अंदाज येत नव्हता. मात्र, महायुतीबद्दल राज्यात सर्वत्र रोष होता आणि सोबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सहानुभूती होती. त्यामुळे विधानसभेत लोकसभेचीच पुनरावृत्ती होईल, असा अंदाज होता. कारण एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची गद्दारी अनेकांच्या डोक्यात बसलेली होती. त्यामुळे या निवडणुकीत सत्ताधा-यांचीच उलथापालथ होईल, अशी स्थिती होती. परंतु प्रत्यक्षात २३ नोव्हेंबर रोजी जेव्हा निकाल लागला, तेव्हा महाविकास आघाडीचीच माती झाली आणि महायुतीला पाशवी बहुमत मिळाले. त्यांनी २८८ पैकी तब्बल २३६ जागांवर विजय मिळविला. त्यामुळे हा निकाल अनाकलनीय आणि अविश्वसनीय ठरला. अनेक शंकांना बळ मिळाले. ईव्हीएमवर शंका उपस्थित झाल्या. त्यावरून आता नव्याने वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
लोकशाहीत जनता आपल्या मतदानातून कोणाला सत्तेवर आणायचे आणि कोणाला घरी बसवायचे, याचा निर्णय करीत असते. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत गद्दारांना पुन्हा एकदा धडा शिकवून भाजपने जो कायदे धाब्यावर बसवून सोयीनुसार नवी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्याला पुरोगामी महाराष्ट्रात नक्कीच चपराक बसेल, असा विश्वास वाटत होता. निवडणूक झाल्यानंतरदेखील मतदानोत्तर अंदाजातून तीच शक्यता व्यक्त केली जात होती. कारण मतदारांमधून हीच भूमिका समोर येत होती. त्यातल्या त्यात तुतारीने तर राज्यात सर्वत्र सरकारविरोधी हवा केली होती. असे असतानाही निवडणूक निकालात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सर्वांत कमी अवघ्या १० जागा कशा निवडून येतात, असा प्रश्न सामान्य मतदारांना पडल्याशिवाय राहात नाही. विशेष म्हणजे महायुतीच्या उमेदवारांचा विजय हजारो मतांनी होतो आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार निवडून आले, ते अगदी काठावर कसे येऊ शकतात, एवढेच काय तर कॉंग्रेसचे दिग्गज उमेदवार कसे पडू शकतात, त्यात जे विधिमंडळ गाजविणारे आक्रमक चेहरे आहेत, ज्यात बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, बच्चू कडू यांच्यासारखे नेते कसे पराभूत होतात आणि मतदानात एवढी तफावत कशी काय येऊ शकते, असे प्रश्न निकालानंतर उपस्थित झाले. महाराष्ट्रात असा एकही विभाग नाही, जिथे महाविकास आघाडीला विजयश्री खेचून आणण्यात यश आले. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्र शरद पवार यांचा गड मानला जातो. तिथेही शरद पवार जिंकू शकले नाहीत. जिथे हवा होती, तिथेच पराभव झाला तर इतरत्र विजयाचा प्रश्नच नव्हता. अजित पवारांच्या विरोधात तुतारी प्रबळ असताना अजित पवारांनी ४१ जागांवर विजय मिळविला आणि शरद पवार गटाला १० जागांवरच थांबावे लागले, यातील गौडबंगाल कोणालाही समजले नाही. त्यामुळे या निवडणूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राज्यात २८८ जागांसाठी एकूण ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांपैकी ६ कोटी ४० लाख ८८ हजार १९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत २,०८६ अपक्ष उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत ८५ टक्के म्हणजेच ४१३६ उमेदवारांपैकी ३ हजार ५१५ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. मुंबई उपनगरात २६१ आणि पुण्यात २६० उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. सर्वाधिक महाविकास आघाडीच्या २२ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. यात कॉंग्रेस आघाडीवर आहे. त्यांच्या ९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. राज्यात निवडणुकीअगोदर महाविकास आघाडीला सहानुभूती असताना उलटा निकाल लागला. ही बाब धक्कादायक ठरली. त्यामुळे महायुतीने महासत्तेच्या जोरावर लोकशाहीला पायदळी तुडवून आणखी एक खेळ केल्याची शंका निर्माण झाली आहे. 
उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र देशातील दुस-या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. पुरोगामी महाराष्ट्र दिल्लीपुढे कधीच झुकत नाही, याची प्रचिती अनेकदा आलेली आहे. परंतु असे असतानाही वेगळा निकाल समोर आणला आहे. त्यामुळे या निकालावर लोकशाही मानणा-या लोकांचा अजिबात विश्वास बसत नाही. यामुळे ईव्हीएमवर शंका निर्माण झाली आहे. कारण महाराष्ट्रातील जनता कधीच एकतर्फी मतदान करीत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवारही ब-याच प्रमाणात जिंकायला पाहिजे होते. परंतु प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्यामुळे यामागे नेमकी काय खेळी झाली आहे, याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.