७८ कोटी नागरिकांना मिळणार मोफत पॅनकार्ड

yongistan
By - YNG ONLINE

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील ७८ कोटी नागरिकांचे पॅन कार्ड अपग्रेड करण्यास सरकारने मंगळवार, दि. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी मंजुरी दिली. या प्रक्रियेसाठी १४३५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. युजर्सचा डेटा अधिक सुरक्षित करणे आणि डिजिटल प्रक्रिया सुलभ करणे हा त्याचा उद्देश आहे. पॅन कार्ड डिजिटल इंडियाला अनुरूप आणि नागरिकांना क्यूआर कोडची सुविधा असलेले पॅनकार्ड मिळणार आहे. १९७२ पासून वापरात असलेले पॅन कार्ड बदलणार आहे. मोदी सरकारने पॅन २.० च्या नवीन एडिशनला मंजुरी दिली. यामुळे देशातील सुमारे ७८ कोटी लोकांना स्थायी खाते क्रमांक (पॅन) कार्ड बदलावे लागणार आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटल्याप्रमाणे, पॅन कार्डची नवीन एडिशन केवळ नवीन वैशिष्ट्यांसह सुसज्ज असेल, तर आपला पॅन क्रमांक तसाच राहील. या कार्डवर एक क्यूआर कोड दिला जाईल. यात तुमची सर्व माहिती असेल. याचा वापर करून कर भरणे किंवा कंपनीची नोंदणी करणे किंवा बँकेत खाते उघडणे सोपे होणार आहे. पॅन कार्डचे तंत्रज्ञान पूर्णपणे अपग्रेड केले जाईल जेणेकरून ते वापरण्याचा मार्ग सोपा होणार आहे. सर्व प्रकारच्या व्यवसायाची ओळख आणि नोंदणी सुलभ करण्यासाठी विशेष वैशिष्ट्ये जोडली जातील. 
मोफत सुधारणा होणार
पॅन कार्डच्या अपग्रेड व्हर्जनसाठी सामान्य माणसाला काहीही करण्याची गरज नाही असे केंद्रीय मंत्र्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी कुठेही अर्ज करण्याची गरज भासणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. देशातील ज्या ७८ कोटी लोकांना पॅन कार्ड देण्यात आले आहे त्यांना विभागाकडून नवीन पॅन कार्ड पाठविण्यात येणार आहे.