मुंबई : प्रतिनिधी
महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर विधानसभेचा कार्यकाळ संपल्याने एकनाथ शिंदे यांनी मंगळवार, दि. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडण्याच्या सूचना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी दिल्या. शिंदे यांनी ३० जून २०२२ ला शपथ घेतली. त्यानंतर त्यांच्या सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. यामध्ये एक रुपयात पीक विमा योजना, महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत, आनंदाचा शिधा यासारख्या योजना लोकप्रिय ठरल्या.
एक रुपयात पीक विमा योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजनेद्वारे देशातील शेतक-यांच्या शेतातील पिकाचा पीक विमा उतरवला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतक-यांना फक्त एक रुपयात पीक विमा भरण्याची सोय उपलब्ध करून दिली. अनेक शेतक-यांना योजनेचा फायदा झाला.
महिलांना एसटी प्रवासात सवलत
एकनाथ शिंदे यांच्या सरकारने महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे उत्पन्नही वाढले.
नमो शेतकरी महासन्मान योजना
पीएम किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली. राज्यातील शेतक-यांना ६ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. या योजनेचे ५ हप्ते शेतक-यांच्या खात्यावर जमा झाले.
आनंदाचा शिधा योजना
शिंदे सरकारने आनंदाचा शिधा योजना आणून रेशनकार्ड धारकांना गणेशोत्सव, दिवाळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि इतर सणांचे निमित्त साधत १०० रुपयांमध्ये विविध वस्तू देण्याचा निर्णय घेतला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाही लोकप्रिय ठरली. या योजनेद्वारे राज्यातील अडीच कोटी महिलांच्या खात्यात आतापर्यंत प्रत्येकी साडेसात हजार रुपयांची रक्कम पाठवण्यात आली. याशिवाय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनाही सुरु करण्यात आली.
मुख्यमंत्री मोफत बळीराजा वीज योजना
या योजनेद्वारे शेतक-यांचे साडे सात एचपीपर्यंतच्या कृषिपंपांच्या कनेक्शनसाठीचे वीज बिल माफ करण्यात आले. थकित बिलाची रक्कमही माफ करण्यात आली.
मराठा समाजाला १० टक्के आरक्षण
मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करुन आरक्षण देण्याचा निर्णयदेखील एकनाथ शिंदेंनी घेतला.