वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
भारतीय वंशाचे काश पटेल आता अमेरिकेतील तपास यंत्रणाचे नवे अध्यक्ष असतील. अमेरिकेचे नवनियुक्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दि. १ डिसेंबर २०२४ रोजी त्यांची नियुक्ती केली आहे. एफबीआय या तपास संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती होणारे ते पहिलेच भारतीय अमेरिकन व्यक्ती असतील. काश पटेल (वय ४४) यांचे मूळ नाव कश्यप पटेल असे असून ते अमेरिकेतील एक प्रसिद्ध वकील आहेत. अयोध्येत ज्यावेळी राम मंदिराची निर्मिती केली होती, त्यावेळी त्याचे समर्थन काश पटेल यांनी केले होते.
डोनाल्ड र्ट्प्म यांनी त्यांच्या सोशल मीडियावर काश पटेल यांच्या नियुक्तीसंदर्भात माहिती दिली आहे. काश पटेल यांची एफबीआयच्या प्रमुखपदी नियुक्ती करताना आम्हाला अभिमान वाटतो, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. काश पटेल हे डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच त्यांनी त्यांच्यावर देशातील सर्वांत मोठ्या तपास संस्थेची जबाबदारी सोपविली आहे. काश पटेल यांचीही हिंदू धर्मावर प्रचंड श्रद्धा आहे. हिंदू धर्माशी असलेला संबंधही त्यांनी त्यांच्या पुस्तकात नमूद केला आहे. त्याचबरोबर भारतातील अयोध्येत राम मंदिर उभारणीच्या वेळी त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला होता.
काश पटेल मूळ गुजरातचे रहिवासी
काश पटेल हे मूळ भारतीय असून, ते गुजरातचे रहिवासी आहेत. मागील अनेक वर्षांपासून ते अमेरिकेत राहतात. आता ते तेथील रहिवासी झाले आहेत. ते अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. त्यांनी २०१७ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात चीफ ऑफ स्टाफ ऑफ डिफेन्स सेक्रेटरी म्हणून काम पाहिले होते. आता त्यांच्यावर एफबीआयच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपविली आहे.