तबला वादनातील कोहिनूर हरपला

yongistan
By - YNG ONLINE
सॅन फ्रान्सिस्को : वृत्तसंस्था
ज्येष्ठ तबलावादक आणि शास्त्रीय संगीतकार उस्ताद झाकीर हुसेन यांचे रविवारी रात्री अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. झाकीर हुसेन यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने तबला वादनातील कोहिनूर हरपला. त्यामुळे भारतीय संगीत क्षेत्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

झाकीर हुसैन यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे वास्तव्य अमेरिकेत होते. त्यांना हृदयविकाराचा त्रास होता. गेल्या आठवड्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी प्रकृतीत सुधारणा झाली. परंतु पुन्हा १५ डिसेंबर रोजी त्यांची तब्येत बिघडली. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर तातडीने आयसीयूमध्ये उपचार सुरू करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान सॅन फ्रान्सिस्को येथे अखेरचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने तबल्याचे हे सूर शांत झाले.भारतीय शास्त्रीय संगीत घराघरांत पोहोचवून एकल तबला वादनाला स्वतंत्र ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. साथ संगतकार म्हणून आपला अमिट ठसा उमटविताना त्यांनी तीन पिढ्यांच्या गायक, संगीतकारांसोबत त्यांनी तबलावादन केले.                         
        
झाकीर हुसैन हे प्रसिद्ध दिवंगत तबला संगीतकार अल्लाह राखा खान यांचे चिरंजीव होते. अनेक प्रसिद्ध भारतीय आणि परदेशी चित्रपटांसाठी त्यांनी तबला वाजवला. तसेच ‘साझ’ या सिनेमात त्यांनी अभिनयही केला. वयाच्या ७ व्या वर्षी त्यांनी वडील अल्लाह राखा खान यांच्याकडे तबला शिकण्यास सुरुवात केली. वयाच्या १२ व्या वर्षी देशभरात फिरताना त्यांनी परफॉर्म करण्यास सुरुवात केली. सुमारे चार दशकांपूर्वी उस्ताद झाकीर हुसैन संपूर्ण कुटुंबासह अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे स्थायिक झाले. त्यांचे तबला वादनात खूप मोठे योगदान असून, त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना देश-विदेशातील अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. हुसैन यांनी कथ्थक डान्सर अ‍ँटोनिया मिनेकोला यांच्याशी लग्न केले होते. त्यांना दोन मुली आहेत. कुटुंबीयासह ते सॅन फ्रान्सिस्कोत राहात होते.

विविध पुरस्कारांनी सन्मानित
भारत सरकारने १९८८ मध्ये पद्मश्री, २००२ मध्ये पद्मभूषण, २०२३ मध्ये पद्मविभूषण यासारख्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. यासोबतच १९९० मध्ये संगीत नाटक अकादमीचा सर्वोच्च संगीत पुरस्कारही मिळाला. २००९ मध्ये ५१ व्या ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांना ७ वेळा ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले, त्यापैकी चार वेळा त्यांना हा पुरस्कार मिळाला.