शानदार सोहळ््यात फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, एकनाथ शिंदे,अजित पवार झाले उपमुख्यमंत्री
मुंबई : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अनेक केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उद्योगपती व बॉलीवूडमधील अनेक कलाकारांच्या उपस्थितीत खचाखच भरलेल्या आझाद मैदानात गुरुवार, दि. ५ डिसेंबर रोजी रंगलेल्या जंगी शपथविधी सोहळ््यात देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स ठेवून अखेर मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि अजित पवार यांनी यावेळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर सर्वत्र एकच जल्लोष करण्यात आला. तसेच फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान, नागपूर हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मुख्यमंत्री पदासाठी झालेली रस्सीखेच व शिवसेनेने गृहाखात्यासह महत्वाच्या खात्यांसाठी धरलेला आग्रह यामुळे प्रचंड बहुमत मिळूनही राज्यात महायुतीचे सरकार येण्याची वाट अडली होती. अखेर आज नवे सरकार सत्तारूढ झाले. महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. मावळते मुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा, केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषि मंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर, केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंदर यादव, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री एच. डी. कुमारस्वामी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय सूक्ष्म मध्यम लघु उद्योगमंत्री जितनराम मांझी, केंद्रीय दळणवळण मंत्री जोतिरादित्य सिंधिया, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू, केंद्रीय मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंह, केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री चिराग पासवान उपस्थित होते.
तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा, छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, त्रिपुराचे मुख्यमंत्री मानिक साहा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगस्वामी, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन मांझी, मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह, नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग, केंद्रीय राज्यमंत्री सर्वश्री रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ, प्रतापराव जाधव, रक्षाताई खडसे, विविध राज्याचे उपमुख्यमंत्री सर्वश्री केशवप्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक, पवन कल्याण, राजेंद्र शुक्ला, अरुण सावो, विजय शर्मा, प्रेमचंद बैरवा, विजयकुमार सिन्हा आदींच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ््याला महायुतीचे राज्यभरातील समर्थक, कार्यकर्ते उपस्थित होते. सिनेसृष्टीमधील दिग्गजांनीदेखील या सोहळ््याला हजेरी लावली.
नाराजीनाट्य संपले
एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये स्वत: सहभागी होणार की नाही, याबाबत दुपारपर्यंत अनिश्चितता होती. शिवसेनेचे सर्व मंत्री, अनेक आमदार त्यांचे मन वळवण्यासाठी वर्षा निवासस्थानी ठिय्या मांडून बसले होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन हेही वर्षावर बसून होते. अखेर शिंदे यांनी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होण्यास तयारी दाखवली. त्यामुळे अनिश्चितता संपली आणि ते आझाद मैदानावरील शानदार सोहळ््यात नेहमीच्या जोशात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
फडणवीस तिस-यांदा मुख्यमंत्री
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज तिस-यांदा शपथ घेतली. २०१४ ते १९ या काळात ते राज्याचे मुख्यमंत्री होते. २०१९ ला त्यांनी अजित पवार यांच्यासह सरकार स्थापन केले होते. पण त्यांना ७२ तासात राजीनामा द्यावा लागला होता. मविआ सरकारच्या काळात ते विरोधी पक्षनेतेदेखील होते. एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर त्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. आज ते तिस-यांदा मुख्यमंत्री झाले.
अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी सहाव्यांदा शपथ घेतली. मागच्या पाच वर्षात अजित पवार यांनी तीन राज्य सरकारांमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शाप्थ घेतली होती. सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे अजित पवार हे देशातील पहिले उपमुख्यमंत्री ठरले आहेत.
विरोधकांच शपथविधी
सोहळ््यावर अघोषित बहिष्कार
शपथविधी सोहळ््यासाठी महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आदी बड्या नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आले होते. मात्र, शपथविधी सोहळ््याला कोणीही बडा नेता उपस्थित नव्हता.
फडणवीसांची पहिली स्वाक्षरी,
पुण्याच्या रुग्णाला ५ लाखांची मदत
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी फडणवीस यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली. पुण्यातील रुग्ण चंद्रकांत शंकर कु-हाडे यांना ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत. चंद्रकांत कु-हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती.