ब्रिस्बेन : वृत्तसंस्था
भारताचा महान फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने बुधवार, दि. १८ डिसेंबर २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. भारत आणि ऑस्ट्रेलियातील गाबा येथे झालेल्या कसोटी सामन्यानंतर अश्विनने ही घोषणा केली. अश्विनने गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही कमाल करून दाखवली. त्याने कसोटी तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली. ब्रिस्बेनमधील तिस-या कसोटीनंतर पत्रकार परिषदेत त्याने निवृत्ती जाहीर केली.
भारत-ऑस्ट्रेलियातील कसोटी सामना आज अनिर्णित राहण्याची घोषणा होताच काही वेळाने अश्विन कर्णधार रोहित शर्मासोबत आला आणि त्याने निवृत्तीची घोषणा केली. आता तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळणार नाही. मात्र, उर्वरित २ कसोटी सामन्यांत संघासोबत राहील, अशी अपेक्षा आहे. अश्विनने जड अंत:करणाने निवृत्ती जाहीर केली. मात्र, तरीही तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे.
अश्विनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
अश्विनने भारतासाठी १०६ कसोटी सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर ५३७ विकेट्स आहेत. आपल्या कारकिर्दीत त्याने ३७ वेळा ५ विकेट्स आणि ८ वेळा दहा विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. त्याने भारतासाठी ११६ एकदिवसीय सामने खेळले असून १५६ बळी घेतले आहेत. यासोबत ६५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून ७२ बळी घेतले आहेत.
अश्विनचे सर्वोत्तम रेकॉर्ड
अश्विनच्या उत्कृष्ट विक्रमाबद्दल बोलायचे झाल्यास त्याने ११ वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणा-या गोलंदाजांच्या यादीत तो सध्या सातव्या क्रमांकावर आहे. जर आपण सक्रिय खेळाडूंबद्दल बोललो तर अश्विन पहिला येतो. त्याने ३७ वेळा एका डावात ५ विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत तो दुस-या क्रमांकावर आहे.