आदिवासींचा कैवारी हरपला
नाशिक : प्रतिनिधी
भाजपचे ज्येष्ठ नेते, आदिवासी नेते माजी मंत्री मधुकर पिचड यांचे शुक्रवार, दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. नाशिक येथील ९ पल्स रुग्णालयात त्यांच्यावर दीड महिन्यापासून उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती आणखी खालावली. त्यामुळे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक वर्षे आदिवासी विकास मंत्रिपदाचा पदभार सांभाळून आदिवासींना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना दीड महिन्यापूर्वी ब्रेनस्ट्रोक आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते भाजपचे ज्येष्ठ नेते होते. एकेकाळी ते शरद पवार यांचे खंदे समर्थक होते. मात्र, २०१९ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मग भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास झाला. १९८० ते २०१४ या काळात त्यांनी अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले. १९९५ ते १९९९ या काळात ते विधानसभेत विरोधीपक्ष नेते होते.
मधुकर पिचड यांनी १९६१ साली अकोले येथे अमृतसागर दूध सहकारी संस्थेची स्थापना केली तर अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक अध्यक्ष होते. पिचड यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून झाली नंतर ते शरद पवारांसोबत राष्ट्रवादीत आले. पक्षात त्यांनी प्रदेशाध्यक्षांसह विविध खात्याचे मंत्रिपदही भूषविले. पण २०१९ साली त्यांनी पुत्र वैभव पिचडसह भाजपमध्ये प्रवेश केला.
तब्बल ३४ वर्षे अकोलेचे प्रतिनिधित्व
मधुकर पिचड यांनी सलग ३४ वर्षे अकोले मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. १९९१ साली सुधाकर नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. त्यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालय होते. त्यानंतर पिचड यांनी शरद पवार, विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले.