प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल कालवश

yongistan
By - YNG ONLINE
चित्रपट सृष्टीतील एका युगाचा अंत
मुंबई  : प्रतिनिधी
देशातील नामांकित चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, समांतर चित्रपटसृष्टीचे प्रणेते आणि १८ वेळा राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरलेले श्याम बेनेगल यांचे सोमवार, दि. २३ डिसेंबर रोजी वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील वोखार्ट रुग्णालयात सोमवारी सायंकाळी ६.३८ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांची कन्या पिया बेनेगल यांनी दिली. बेनेगल मागच्या ब-याच दिवसांपासून आजारी होते. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत ५० वर्षांपेक्षा अधिक काळ घालविला आहे. त्यामुळे यांच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला आहे. 
 गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. मूत्रपिंडाच्या आजाराने ते त्रस्त होते. त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्याने त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मूत्रपिंड निकामी झाल्याने त्यांना घरीच डायलिसिस सुरू होते.  १४ डिसेंबर रोजी त्यांचा ९० वा वाढदिवस साजरा झाला. त्यानंतर आज त्यांची प्राणज्योत मालवली. श्याम बेनेगल हे फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते, सह्याद्री फिल्म्स नावाच्या कंपनीचे ते मालक होते. त्यांनी मुख्य प्रवाहातील सिनेमे, आर्ट फिल्मसच्या माध्यमातून वास्तववाद, सखोल अभ्यास आणि कथाकथनाची उत्कृष्टता दाखवून दिली. 
श्याम बेनेगल यांनी १९७४ मध्ये त्यांच्या चित्रपट दिग्दर्शनाची सुरुवात केली. अंकुर नावाच्या चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली. हा त्यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला पहिला चित्रपट होता. १९८६ मध्ये त्यांनी टीव्हीच्या दुनियेतही प्रवेश केला. त्यांनी यात्रा ही मालिका दिग्दर्शित केली. त्यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये निशांत, मंथन, भूमिका, मंडी, कोंडुरा यासारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे. चित्रपटांसोबत त्यांनी अनेक माहितीपट, जाहिरात चित्रपटाचे दिग्दर्शन केले. 
अंकुर चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून श्याम बेनेगल यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला ४३ पुरस्कार मिळाले. ज्यामध्ये राष्ट्रीय पुरस्काराचाही समावेश आहे. तसेच त्यांनी मंथन, कलयुग, निशांत, आरोहण, भूमिका, जुनून असे अनेक अविस्मरणीय चित्रपट केले. ‘महाभारत’ या संकल्पनेवर त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘कलयुग’ हा सिनेमा आजही सिनेसृष्टीतला मास्टरपीस मानला जातो. ‘सरदारी बेगम’ हा त्यांचा उर्दू सिनेमा अनेक कारणांनी चर्चेत राहिला तर ‘झुबैदा’ हा सिनेमाही चर्चेत होता. ‘नेताजी सुभाषचंद्र बोस द फरगॉटन हिरो’ आणि ‘वेल डन अब्बा’ हे त्यांचे अलिकडचे चर्चेत राहिलेले चित्रपट आहेत. 
श्याम बेनेगल यांचा जन्म १४ डिसेंबर १९३४ रोजी सिकंदराबाद येथे झाला. कॉपी रायटर म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. नंतर मेहनतीच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत नावलौकिक मिळविला. हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान कदापि विसरता येणार नाही. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला अनेक मौल्यवान अभिनेते, अभिनेत्री दिल्या. त्यात नसीरुद्दीन शहा, ओम पुरी, अमरिश पुरी, अनंत नाग, गिरीश कर्नाड, शबाना आझमी, स्मिता पाटील यांचा नामोल्लेख करता येईल.
मालिकांचीही निर्मिती
चित्रपटांसोबत बेनेगल यांनी अनेक माहितीपट आणि जाहिरात चित्रपटांचे दिग्दर्शन केले. तसेच दूरदर्शनवरील भारत एक खोज आणि कहता है जोकर, कथासागर या प्रसिद्ध मालिकाही श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केल्या.  तसेच त्यांचे गुरु सत्यजित रे आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर डॉक्युमेंट्री बनवल्या. चित्रपट निर्मितीपूर्वी ते फोटोग्राफी करायचे.
स्वत:च्या चित्रपटांवर 
एकूण ३ पुस्तकांचे लेखन
श्याम बेनेगल यांनी द चर्निंग विथ विजय तेंडुलकर (१९८४), सत्यजित रे (१९८८) आणि द मार्केटप्लेस (१९८९) या त्यांच्या स्वत:च्या चित्रपटांवर आधारित तीन पुस्तके लिहिली आहेत. 
 
समांतर चित्रपटाची चळवळ
दादासाहेब फाळके यांनी भारतात सिनेमाची मुहूर्तमेढ रोवली आणि भारतीय चित्रपटाचा प्रवास सुरू झाला. सुरुवातीला आध्यात्मिक आणि मनोरंजनात्मक चित्रपटाचा प्रवास सुरू झाला. याच काळात स्वातंत्र्य चळवळीला चालना देणारे आणि सामाजिक वास्तव दाखविणारे सिनेमेही येऊ लागले. मात्र, पुढे मनोरंजन हा एकच बाज कायम राहिला. मात्र, स्वातंत्र्यानंतर सामाजिक भान देणारी आणि वास्तववादी चित्रपट येत होती. त्यात सत्यजित रे, बिमल रॉय, व्ही. शांताराम, गुरु दत्त, कैफी आजमी, बलराज सहानी आदी दिग्दर्शक, कलाकारांनी सामाजिक वास्तव समोर आणले. त्यानंतर ७०-८० च्या दशकात श्याम बेनेगलसारखे तरुण दिग्दर्शक समोर आले आणि सामाजिक चित्रपटांना नवा आयाम देत १९७० आणि १९८० च्या दशकात समांतर चित्रपटांची चळवळ सुरू केली. यातून वास्तववाद आणि सामाजिक बाबींवर भाष्य केले. अर्थात, त्यांनी मनोरंजनावर आधारलेल्या प्रस्थापित सिनेमांना छेद देत समांतर चित्रपटांच्या युगास प्रारंभ केला. 

बेनेगल यांना १८ राष्ट्रीय पुरस्कार
प्रख्यात दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना १८ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार आणि नंदी पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. १९७६ मध्ये भारत सरकारने देशाचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री देऊन सन्मानित केले. १९९१ मध्ये त्यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी देशातील तिसरा-सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण देऊन गौरविण्यात आले. २००५ मध्ये चित्रपट क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.