दक्षिण कोरियात आणीबाणी लागू

yongistan
By - YNG ONLINE
सेओल : वृत्तसंस्था 
दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक-योल यांनी मंगळवारी विरोधी पक्षांवर सरकार अपंग बनविणे, उत्तर कोरियाप्रति सहानुभूती ठेवणे आणि देशाची संवैधानिक व्यवस्था कमकुवत करण्याचा आरोप करीत मंगळवार, दि. ३ डिसेंबर २०२४ रोजी देशात आणीबाणीची (इमर्जन्सी मार्शल लॉ) घोषणा केली. टेलिव्हिजनवरून देशाला संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली. त्यामुळे दक्षिण कोरियातील तणाव आणखी वाढला आहे. या संघर्षाचे राजकीय युद्धात रुपांतर होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून यांच्या कंझर्व्हेटिव्ह पीपल्स पॉवर पार्टीचा पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पीय विधेयकावर उदारमतवादी विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाशी संघर्ष सुरू आहे. त्यांची पत्नी आणि उच्च अधिका-यांच्या घोटाळ््याच्या चौकशीची मागणीही ते फेटाळत आहेत. त्यामुळे त्यांचे राजकीय विरोधक त्यांना कोंडीत पकडत आहेत. या पार्श्वभूमीवर या निर्णयाला विशेष महत्त्व आहे.
उत्तर कोरियाच्या कम्युनिस्ट शक्तीकडून निर्माण होणा-या धोक्यांपासून दक्षिण कोरियाचे संरक्षण करण्यासाठी आणि देशविरोधी घटकांना संपविण्यासाठी मी आणीबाणी मार्शल लॉ घोषित करीत आहे. देशाच्या स्वतंत्र आणि घटनात्मक व्यवस्थेचे रक्षण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले. पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पावरून युन यांनी पीपल्स पॉवर पार्टी आणि विरोधी डेमोक्रॅटिक पार्टी यांच्यात सुरू असलेल्या वादानंतर ही घोषणा करण्यात आली. मे २०२२ मध्ये पदभार स्वीकारल्यापासून विरोधी पक्षाच्या नियंत्रणाखाली असलेल्या नॅशनल असेंब्लीमध्ये विरोधाचा सामना करणा-या यून यांनी सुव्यवस्था पुनर्स्थापित करण्यासाठी आणि दक्षिण कोरियाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी हे पाऊल आवश्यक असल्याचे म्हटले.