मुख्यमंत्री फडणवीसांकडे गृह खाते

yongistan
By - YNG ONLINE
एकनाथ शिंदेकडे नगरविकास, अजितदादांकडे पुन्हा अर्थखाते

नागपूर : प्रतिनिधी 
राज्यमंत्रीमंडळाचे खातेवाटप अखेर शनिवार, दि. २१ डिसेंबर २०२४ रोजी जाहीर झाले आहे. अपेक्षेप्रमाणे गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडेच ठेवले आहे. गृहसोबतच उर्जा, विधि व न्याय, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण तसेच इतर मंत्रयांना वाटप न झालेले सर्व विभाग हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार आहेत. 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महत्वाचे असे नगरविकास, गृहनिर्माण,सार्वजनिक बांधकाम उपक्रम ही खाती देण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अपेक्षेनुसार आधीचेच अर्थमंत्रालय आणि राज्य उत्पादन शुल्क ही खाती देण्यात आली आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल हे महत्वाचे खाते देऊन त्यांना प्रमोशन देण्यात आले आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण आणि पशुसंवर्धन खाते देण्यात आले आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर लगेचच राज्यमंत्रीमंडळाचे खातेवाटप शनिवारी रात्री जाहीर करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा ५ डिसेंबर २०२४ रोजी शपथविधी झाला होता. त्यानंतर विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या. महायुतीत काही खात्यांवर एकमत होत नसल्याने विस्तार रखडला होता. अखेर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला १५ डिसेंबर रोजी नागपूरात ३९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. छगन भुजबळ यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा समावेश न झाल्याने त्यांची नाराजी सरकारला झेलावी लागली. नंतर पूर्ण अधिवेशन खातेवाटपाविनाच पार पडले. अखेर अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर शनिवारी रात्री मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. 

चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल खाते देत त्यांचे प्रमोशन करण्यात आले. राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंधारण, चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण, उदय सामंत, मंगलप्रभात लोढा, आदिती तटकरे,गुलाबराव पाटील यांच्याकडे त्यांची आधीच्या सरकारमधीलच खाती कायम ठेवण्यात आली आहेत. शिवेंद्रराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम खाते देण्यात आले आहे.