आरबीआयचा निर्णय, २ लाखांपर्यंत मिळणार तारणमुक्त कर्ज
मुंबई : प्रतिनिधी
रिझर्व्ह बँकेने लहान आणि अल्पभूधारक शेतक-यांना मोठा दिलासा देत शेतक-यांसाठी तारणमुक्त कर्जाची मर्यादा १.६६ लाख रुपयांवरून २ लाख रुपये केली आहे. शेतीसंबंधित वाढते खर्च आणि एकंदर महागाईचा वाढता पारा लक्षात घेऊन शुक्रवार, दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला. यामुळे लहान आणि अल्पभूधारक शेतक-यांसाठी कर्ज उपलब्धता वाढणार आहे.
महागाई आणि शेतीसाठी वापरल्या जाणा-या कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ लक्षात घेता हमीमुक्त कृषी कर्जाची मर्यादा १ लाख ६० हजारांवरुन २ लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आपल्या शेवटच्या पतधोरणात शेतक-यांना मोठा दिलासा दिला. वाढत्या महागाईपासून शेतक-यांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता हमीशिवाय २ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची घोषणा केली.
या निर्णयामुळे अल्प व अल्पभूधारक शेतक-यांना वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्याची व्याप्ती वाढेल, असे शक्तीकांत दास म्हणाले. २०१० मध्ये आरबीआयने कृषी क्षेत्राला कोणतीही हमी न देता १ लाख रुपये कर्ज देण्याची मर्यादा निश्चित केली होती. त्यानंतर २०१९ मध्ये ते १.६ लाख रुपये करण्यात आले होते. आता ही मर्यादा २ लाखांपर्यंत वाढविण्यात आली असून, याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
रेपो रेट जैसे थे
याआधी सलग ११ व्यांदा आरबीआयने रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच रेपो दर ६.५ टक्के राहील. दुसरीकडे सरकारने रोख राखीव प्रमाण ४ टक्क्यांवर आणले आहे. त्यामुळे देशातील बँकांना १.१५ लाख कोटी रुपयांचा फायदा होणार आहे.