विंदांचे गद्यरुप या समीक्षात्मक पुस्तकासाठी पुरस्काराची घोषणा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मराठी साहित्यातील एक अग्रणी समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना विंदांचे गद्यरूप या समीक्षात्मक पुस्तकासाठी २०२४ चा मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार बुधवार, दि. १८ डिसेंबर २०२४ रोजी जाहीर झाला. आपल्याला मिळालेल्या पुरस्कारामुळे आनंद झाला असून, आतापर्यंतचा हा माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार असल्याची भावना रसाळ यांनी व्यक्त केली.
विचक्षण लेखक आणि वाचनमग्न समीक्षक म्हणून साहित्य क्षेत्रात स्वत:ची नादमुद्रा असलेले डॉ. सुधीर रसाळ आता ९१ व्या वर्षातदेखील उत्साहाने साहित्य सेवा करीत आहेत. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख तसेच प्राध्यापक म्हणून ख्यातकीर्त आहेत. या पुरस्काराची घोषणा होताच डॉ. सुधीर रसाळ यांनी हा पुरस्कार भारतात सर्वात सन्मानाचा पुरस्कार आहे. माझ्या आयुष्यात सगळ््यात जास्त समाधान या पुरस्काराने मिळवून दिले आहे. मोठ-मोठे समीक्षक, विचारवंत यांना हा पुरस्कार देण्यात आला. तेव्हा अशा मोठ्या माणसांसोबत आपले नाव जोडले गेले, याचा आनंद आहे, असे म्हटले.
साहित्य अकादमीचा पुरस्कार हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. यंदाच्या वर्षासाठी जी पुस्तके पाठविण्यात आली, ती सगळीच तुल्यबळ होती. नदिष्ठ, भुरा, बौन हा सौमित्र यांचा कवितासंग्रह होता, अभिराम भडकमकरांची इन्शाअल्लाह ही कांदबरी होती, अशा १२ पुस्तकांमधून विंदांचे जे समीक्षात्मक पुस्तक आहे, त्याची निवड करण्यात आली.
८ काव्यसंग्रह, २ कथासंग्रह
३ कादंब-यांनाही पुरस्कार
साहित्य अकादमीच्या वतीने वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कार २०२४ ची घोषणा करण्यात आली. या पुरस्कामध्ये ८ काव्यसंग्रह, ३ कादंब-या, २ कथासंग्रह, ३ निबंध, ३ साहित्यिक समीक्षा, एक नाटक आणि एका संशोधनात्मक पुस्तकाचा समावेश आहे. साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अकादमीच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली.