जीएसटीत वाढ, जैसलमेर येथे झालेल्या बैठकीत निर्णय
जैेसलमर : वृत्तसंस्था
राजस्थानमधील जैसलमेर येथे जीएसटी परिषदेची ५५ वी बैठक शनिवार, दि. २१ डिसेंबर २०२४ रोजी पार पडली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली. यामध्ये जीएसटी दराबाबत फेरविचार झाला तर काही वस्तूंवरील जीएसटी कायम ठेवण्यात आला. काही वस्तूंवर जीएसटी लावण्यात आला आहे. एकीकडे कर्जावरील व्याज दरात कपात होत नसताना मोदी सरकारने पुन्हा एकदा महागाईचा बॉम्ब टाकला. विमा क्षेत्रात जीएसटी कपातीचा निर्णय घेण्याच्या आग्रही मागणीलासुद्धा जीएसटी परीषदेने वाटण्याच्या अक्षता लावल्याने देशभरात नाराजीचा सूर आळवला गेला. साखर आणि कॅरमेलपासून तयार केलेल्या पॉपकॉर्नला सर्वाधिक १८ टक्के जीएसटी आणि जुन्या कारच्या विक्रीवर १२ वरून १८ टक्क्यांपर्यंत जीएसटीत वाढ केली.
फोर्टिफाईड तांदळावरील कर रचना परिषदेने अजून सुटसुटीत केली. जीएसटी परिषदेने त्यावर ५ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला. त्याचा वापर कोणताही पदार्थ तयार करण्यासाठी होत असेल तरी रेडी टू इट पॉपकॉर्नवर कर द्यावा लागणार आहे. साधे पॉपकॉर्न ते मसाला पॉपकॉर्न, पॅकेज्ड अथवा लेबल लावलेले नसतील तर त्यावर ५ टक्के जीएसटी मोजावा लागणार आहे तर पॅकेज्ड आणि लेबल लावलेल्या पॉपकॉर्नसाठी १२ टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे तर साखर आणि कॅरमेलपासून तयार पॉपकॉर्नसाठी सर्वाधिक १८ टक्के जीएसटी मोजावा लागेल.
जुन्या कारवर
जीएसटी दरात वाढ
जुन्या आणि वापरलेली कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आता अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. या वाहनांच्या विक्रीवर १२ वरून १८ टक्के जीएसटी मोजावा लागणार आहे. तसेच विम्यावरील जीएसटी कपातीचा निर्णय सध्या परिषदेने थंड बस्त्यात ठेवला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.