बलुचिस्तानसाठी बलूच लिबरेशन आर्मीचा निकराचा लढा
इस्लामाबाद : वृत्तसंस्था
बांग्लादेश स्वतंत्र होण्यापूर्वीच बलूची लोकांची स्वातंत्र्याची मागणी आहे. सिंध आणि पंजाब प्रदेशाच्या सुपीक जमिनीवर या देशाची अर्थव्यवस्था काम करते. पण आता या प्रांतातही स्वातंत्र्याचे धुमारे फुटले आहेत. यासाठी बलूच लिबरेशन आर्मीने निकाराचा लढा सुरू केला आहे. त्यामुळे पाकिस्तानी लष्कर आणि प्रशासन जेरीस आले आहे. अलिकडे तर थेट रेल्वेच हायजॅक करून मोठा नरसंहार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पाकला पुन्हा एकदा फाळणीला सामोरे जावे लागू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
या अगोदर पाकिस्तानच्या जुलूमशाहीला कंटाळून बांग्लादेश स्वतंत्र झाला. तिथे तख्तापलट करण्याचे आयएसआयचे स्वप्न पूर्ण झाले. पण देशांतर्गत सुरू असलेली बंडखोरी त्यांना थोपवता आलेली नाही. सध्या पाकिस्तानचे अनेक बडे अधिकारी आणि नेते बलुचिस्तान लवकरच स्वतंत्र होईल, असे जाहीरपणे सांगत आहेत. बलूच लोकांवर पाकिस्तानी लष्कराने, प्रशासनाने गेल्या ७० वर्षात अपरिमित अत्याचार केले. अनेक बलूच नेते, तरुणांना हाल हाल करून मारले.
या लढाऊ जमातीला अत्याधुनिक शस्त्र आणि दारुगोळा मिळाल्याने त्यांनी पाकिस्तानी अधिकारी, लष्करावरील हल्ले वाढवले. मंगळवार, दि. ११ मार्च २०२५ रोजी तर जाफर एक्स्प्रेस ही अख्खी ट्रेनच हायजॅक केली. यामध्ये प्रवाशी, आयएसआयचे अधिकारी, लष्कराचे जवान, अधिकारी यांचा समावेश होता. ही ट्रेन आणि ओलिस यांना सोडवण्यात पाक आर्मीला यश आले. सध्या पाकिस्तानमधील बलूचिस्तान आणि शेजारील इराण या देशातील दक्षिण-पूर्वेतील बलूच प्रदेश यांचा मिळून एक राष्ट्र करण्याची त्यांची जुनीच मागणी आहे. बलुचिस्तान आता स्वातंत्र्याच्या अंतिम टप्प्यात आहे.
१८७६ पासून बलूचिस्तान स्वतंत्र
बलूचिस्तानसोबत इंग्रजांनी एक करार केला होता. १८७६ मध्ये हा करार झाला होता. त्यानुसार ब्रिटिश राजवटीपासून या प्रदेशाला मुक्त स्वायत्तता बहाल करण्यात आली होती. भारत-पाकिस्तान फाळणी वेळी बलूची नेत्यांनी ५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र राष्ट्राची घोषणा केली. अखेरचा इंग्रज व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन याच्याशी चर्चेदरम्यान बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी स्वतंत्र राष्ट्राला मान्यतेचा कांगावा केला. पण अवघ्या ७-८ महिन्यातच पाकिस्तानी लष्कर आणि टोळीवाल्यांनी बलूचिस्तानवर कब्जा केला. तेव्हापासून हा संघर्ष सुरू आहे. विशेष म्हणजे या प्रदेशातच अब्दाली सोबत बंदी म्हणून नेण्यात आलेले मराठा आहेत.
ग्रेटर बलूचिस्तानमुळे
इराणची वाढली चिंता
बलूच लोकांचा सर्वात मोठा बलूचिस्तान हा प्रदेश पाकिस्तानमध्ये आहे तर दुसरा भाग हा इराणमध्ये आहे. इराणमधील सिस्तान-बलूचिस्तान या नावाने हा प्रदेश ओळखला जातो. हा प्रदेश इराणच्या दक्षिण-पूर्व कोप-यात आहे. तो पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला लागून आहे. हा प्रदेश वाळवंट आणि डोंगरी आहे. याच भागात बलूच बंडखोर लपतात. त्यांचे प्रशिक्षण येथेच होते, असा पाकिस्तानचा आरोप आहे.
भारतासाठी हा भूभाग मोक्याचा
इराणमधील सिस्तान-बलूचिस्तान प्रांतात जोहेदान हे सर्वात मोठे शहर आहे. ती या भागाची राजधानी आहे. तर चाबहार हे सर्वात मोठे बंदर आहे. भूराजकीयदृष्ट्या हे स्थान अत्यंत मोक्याचे आहे. सामरिक हालचालीसाठी बंदरच नाही तर हा प्रदेशा भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या ठिकाणी इराण, अफगाणिस्तान आणि भारताचे व्यापारी, व्यापार आणि देवाण-घेवाण करतात.
क्वेटा बलूच प्रांताची राजधानी
पाकिस्तानमधील बलूच प्रांताची राजधानी क्वेटा हे शहर आहे. इराण आणि पाकिस्तानमधील बलूची लोकांमध्ये नातेसंबंध आहेत. त्यामुळे या दोन्ही प्रदेशातील लोकांना वेगळे करण्याचे प्रयत्न इराण आणि पाकिस्तानलाही जमलेले नाही. या दोन्ही प्रदेशातील बलूच नागरिक ग्रेटर बलूचिस्तानची मागणी करत आहेत. सध्या बलूचिस्तान स्वतंत्र होण्याच्या चर्चा वेगाने पसरल्या आहेत. त्याच शरीफ सरकारला मनस्ताप होत आहे.