मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
मुंबई : प्रतिनिधी
गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा घडवणारे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, दि. २० मार्च २०२५ रोजी विधानसभेत घोषणा केली. २५ लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कोकणात उभारल्या जाणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््याचे कामदेखील राम सुतार यांनाच देण्यात आले आहे. या महान शिल्पकाराचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असून, या पुरस्काराने राज्य सरकार दरवर्षी महाराष्ट्रातील एका महान सुपुत्राचा गौरव करत असते. १२ मार्च २०२५ रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीत महाराष्ट्र भूषण २०२४ या पुरस्कारासाठी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या नावाला मान्यता देण्यात आली. राम सुतार यांचे वय १०० वर्षे आहे. अजूनही ते शिल्प तयार करत आहेत. चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठीची मूर्तीही राम सुतार हेच घडवत आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत दिली.
राम सुतार यांनी आतापर्यंत संसद भवनाच्या आवारातील मौलाना आझाद (१८ फूट), इंदिरा गांधी (१७ फूट), राजीव गांधी (१२ फूट), गोविंदवल्लभ पंत (१० फूट) आणि जगजीवनराम (९ फूट) अशा अनेक मूर्ती घडवल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, इंदिरा गांधी, राजीव गांधी अशा अनेक दिग्गज नेत्यांच्या शिल्पांची निर्मिती त्यांनी केली. फ्रान्स, इटली, अर्जेंटिना, रशिया, इंग्लंड या ठिकाणीही त्यांनी साकारलेली शिल्पे उभी आहेत. नेत्यांच्या जीवनातील प्रसंगांचे दर्शन घडविणारी भित्तिशिल्पे हेही सुतार यांचे एक वैशिष्ट्य आहे.
अरबी समुद्रातील शिवस्मारक, इंदू मिलचे प्रस्तावित आंबेडकर स्मारक आणि गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटरचा पुतळा ही तिन्ही शिल्पे राम सुतार यांच्या कल्पनेतील आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून देण्यात येणारा २०१६ या वर्षासाठीचा टागोर पुरस्कार जाहीर झाला. एक कोटी रुपये, प्रमाणपत्र आणि पारंपरिक हस्तकला शिल्प असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
राम सुतार यांचा जीवन परिचय
१९ फेब्रुवारी १९२५ रोजी महाराष्ट्रातील धुळ्यामधील गोंडूर या छोट्याश्या गावी एका गरीब कुटुंबात राम सुतार यांचा जन्म झाला. त्यांनी मुंबईच्या ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. १९५२ ते ५८ या काळात तिशीतील राम सुतार यांनी आधी अजिंठा-वेरुळ येथील शिल्पांच्या डागडुजीचे आणि नंतर पंचवार्षिक योजनांचे लाभ सांगणारी लघुशिल्पे बनविण्याचे काम सरकारी नोकरीत राहून केले. राम सुतार यांनी १९६० पासून त्यांचा स्वतंत्र स्टुडिओ उभारला.