केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच आयआयटी मद्रास येथील हायपरलूप चाचणी केंद्राला भेट दिली. या संस्थेच्या मदतीने विकसित होत असलेली हायपरलूप ट्यूब लवकरच जगातील सर्वांत लांब चाचणी नलिका ठरणार आहे. सध्या तिची लांबी ४१० मीटर ्आहे. ती आशियातील सर्वांत मोठी चाचणी सुविधा आहे. हायपरलूप ही व्हॅक्युम ट्यूबमध्ये धावणारी प्रचंड वेगवान रेल्वे प्रणाली आहे. २०१७ मध्ये महाराष्ट्रात पुणे-मुंबईदरम्यान हायपरलूप प्रकल्प राबवण्याचे निर्धारित करण्यात आले होते. यासाठी अमेरिकन कंपनीशी सामंजस्य करारही झाला होता. आता भारत संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे हायपरलूप वाहतूक प्रणाली विकसित करत आहे.
हायपरलूप ही एका प्रकारची उच्च-गती प्रवास प्रणाली आहे, जी कमी दाबाच्या नलिकांमध्ये मॅग्नेटिक लेव्हिटेशन (चुंबकीय उचल तंत्रज्ञान) व व्हॅक्युम ट्यूब ट्रान्सपोर्ट (व्हीटीटी) वापरून गाड्या चालवते. या प्रणालीत प्रतिकार अत्यल्प असल्यामुळे ट्रेन अत्यंत वेगाने प्रवास करू शकते. ही संकल्पना प्रसिद्ध उद्योजक इलॉन मस्क यांनी २०१३ मध्ये मांडली होती.
सायन्स फिक्शन्समधून जवळपास १०० वर्षांपूर्वी ही संकल्पना मांडण्यात आली होती. रॉबर्ट गोडार्ड हे मुख्यत: आधुनिक रॉकेट तंत्रज्ञानाचे जनक म्हणून प्रसिद्ध आहेत. परंतु, त्यांनी फक्त रॉकेट विज्ञानातच नव्हे, तर हाय-स्पीड ट्रान्सपोर्ट तंत्रज्ञानासाठी देखील महत्त्वपूर्ण कल्पना मांडल्या होत्या. गोडार्ड यांनी १९०९ मध्ये, हवेच्या कमी दाबाच्या नलिकेतून (व्हॅक्युम ट्यूब) गाडी चालविण्याची कल्पना मांडली होती. हीच संकल्पना पुढे हायपरलूप तंत्रज्ञानाच्या आधारस्तंभांपैकी एक बनली.
गोडार्ड यांनी असा प्रस्ताव मांडला की, हवेच्या विरळ परिस्थितीत (व्हॅक्युम) जर गाडी चालवली, तर घर्षण कमी होईल आणि ती अतिवेगाने धावू शकेल. त्यांनी १९१० मध्ये या संकल्पनेवर संशोधन सुरू केले आणि १९१४ मध्ये व्हॅक्युम ट्रेनवर पेटंट मिळवले. त्यांच्या प्रणालीत, हवेच्या दाबाचा वापर करून एक ट्रेन ट्यूबमध्ये पुढे ढकलली जात असे, जसे की बंद नळीत एखादा प्लग दाबला जातो. गोडार्ड यांच्या कल्पनेवर आधारित तंत्रज्ञान आजच्या हायपरलूप ट्रेनच्या संकल्पनेत दिसून येते.
आता जगातील अनेक देशांमध्ये हायपरलूप तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. युरोपमध्ये सर्वांत लांब हायपरलूप चाचणी ट्रॅक उघडण्यात आला आहे. २०५० पर्यंत युरोपमध्ये एकूण १०,००० किलोमीटर लांबीचे हायपरलूप नेटवर्क विकसित केले जाईल.
भारतातील हायपरलूप प्रकल्प
भारत सरकार आणि विविध राज्य सरकारे हायपरलूप प्रकल्पाच्या शक्यतांचा अभ्यास करत आहेत. यामध्ये मुंबई-पुणे हा सुमारे १५० कि.मी. हायपरलूप प्रकल्प सर्वाधिक चर्चेत राहिला. शासन आणि लॉस एंजेलिसमधील ‘हायपरलूप’ यांच्यात नोव्हेंबर २०१७ मध्ये यासंदर्भात सामंजस्य करारही झाला होता. हायपरलूप वाहतूक व्यवस्था पूर्णपणे इकोफ्रेंडली आहे. तसेच रस्तेवाहतुकीसाठी होणारे इंधनज्वलन कमी झाल्यास त्याचाही पर्यावरणाला हातभार लागणार आहे. बंगळुरू-चेन्नई या सुमारे ३५० किलोमीटर मार्गावरही हायपरलूप प्रकल्प राबवण्याचा विचार सुरू आहे. या प्रवासासाठी रस्तेमार्गाने होणा-या वाहतुकीत सध्याचा प्रवास वेळ ६ तास इतका आहे. पण हायपरलूपने हे अंतर केवळ ३०-४० मिनिटांमध्ये पार करता येणार आहे. हा प्रकल्प आयआयटी मद्रास आणि काही खासगी कंपन्यांच्या सहकार्याने विकसित केला जात आहे.