फ्लोरिडा : वृत्तसंस्था
नासा क्रू-९ मोहिमेतील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स, निक हेग, बुच विल्मोर आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोरबुनोव्ह हे स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून यशस्वीरित्या पृथ्वीवर परतले. ९ महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर या सर्व अंतराळवीरांनी बुधवार, दि. १९ मार्च २०२५ रोजी पहाटे ३.२७ वाजता पृथ्वीवर पाऊल ठेवले. या सर्व अंतराळवीरांचे कॅप्सूल फ्लोरिडा किनारपट्टीजवळील समुद्रात उतरताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
भारतीय वंशांच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन अंतराळवीर ५ जून २०२४ रोजी स्टारलायनरमधून आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनकडे झेपावले होते. तिथे ८ दिवस घालवल्यानंतर ते परतणार होते. मात्र, त्यांच्या अंतराळयानामध्ये बिघाड झाला. त्यामुळे ते दोघेही तिथेच अडकून पडले. यानंतर नासाकडून सातत्याने त्यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु होते. अनेक अडचणी पार केल्यानंतर अखेर आज म्हणजेच भारतीय वेळेनुसार १९ मार्चच्या पहाटे सर्व अंतराळवीर सुखरुपपणे पृथ्वीवर परतले.
अमेरिकेच्या वेळेनुसार हे कॅप्सूल सोमवारी मध्यरात्री १ नंतर आंतरराष्ट्रीय केंद्रापासून वेगळे झाले. यानंतर भारतीय वेळेनुसार बुधवारी ५ वाजून ५७ मिनिटांनी फ्लोरिडाच्या किना-यावर उतरले. ९ महिन्यांनंतर अंतराळवीरांना घेऊन परतणा-या स्पेसएक्स ‘ड्रॅगन फ्रीडम’च्या लँडिंगसाठी समुद्रातील ८ लँडिंग साईट्स ठरवण्यात आल्या. फ्लोरिडाच्या समुद्रात होणारा अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरचा हा शेवटचा स्प्लॅश डाऊन होता. यासाठी टॅलाहासी या लँडिंग झोनची निवड करण्यात आली. कारण येथील हवामान रिकव्हरीसाठी योग्य होते.
स्पेसएक्स ड्रॅगन फ्रीडमची लँडिंग होताच स्प्लॅशडाऊन साइटच्या जवळपास तैनात केलेल्या रिकव्हरी शिपमधील २ स्पीड बोट ड्रॅगन कॅप्सूलमधील अंतराळवीरांच्या मदतीसाठी पोहोचल्या. त्यांना बाहेर येण्यासाठी मदत केली. कॅप्सूलची तपासणी पूर्ण झाल्यानंतर ड्रॅगनचे दरवाजे उघडून अंतराळवीरांना बाहेर काढले. सर्वप्रथम निक हेग हे स्पेसक्राफ्टच्या कॅप्सूलमधून बाहेर आले. त्यानंतर लगेचच हेग यांनी कॅमे-याच्या दिशेने हात हलवून आनंद व्यक्त केला. त्यानंतर एक-एक करीत चौघेही अंतराळवीर बाहेर पडले.
कॅप्सूलचा संपर्क
काही वेळ तुटला
अंतराळवीर १८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून निघाले. पृथ्वीच्या वातावरणात शिरताच कॅप्सूल भोवतीचे बाहेरचे तापमान १६५० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते. त्यावेळी फ्रीडम कॅप्सूलचा काही वेळ संपर्क तुटला. ही एक सामान्य प्रक्रिया होती. परंतु प्रत्येकाच्या मनात धाकधूक होती. परंतु काही वेळाने संपर्क पुन्हा प्रस्थापित झाला. त्यावेळी सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.
पृथ्वीच्या वातावरणात
येताच पॅराशूटस् उघडले
पृथ्वीच्या वातावरणात शिरण्यापूर्वी क्रूने खिडकीच्या झडपा बंद केल्या. ड्रॅगन हे ऑटोमॅटिक मोडवर प्रवास करत होते. क्रू यावर फक्त लक्ष ठेवून होते. डब्ल्यूबी ५७ हाय अल्टिट्यूड विमानाद्वारे ड्रॅगन फ्रीडमच्या पृथ्वी प्रवासाची समोरची दृश्य दिसत होती. त्यावेळी वेगवेगळ््या वेळेत पॅराशूटस उघडण्यात आली.
१७ तासांचा प्रवास
पॅराशूट्सची पहिली जोडी कॅप्सूल १८ हजार फुटांवर आल्यावर उघडली तर दुसरी मुख्य जोडी ६५०० फुटांवर उघडली. यानंतर ४ पॅराशूटसच्या मदतीने ड्रॅगन फ्रीडम कॅप्सूल तरंगत खाली आले. भारतीय वेळेनुसार १९ मार्चच्या पहाटे ३ वाजून २७ मिनिटांनी स्प्लॅश डाऊन झाला. अवकाश यानाच्या लँडिंगला स्प्लॅशडाऊन म्हणतात. ड्रॅगन कॅप्सूल वेगळे झाल्यापासून ते फ्लोरिडाच्या समुद्रात उतरण्यापर्यंत सुमारे १७ तास प्रवास झाला.