खासगी प्लेसमेंट एजन्सींवर नियंत्रण; विधेयक मंजूर
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील खाजगी प्लेसमेंट एजन्सींवर नियंत्रण आणण्यासाठी आणि युवकांना फसवणुकीपासून संरक्षण मिळावे, यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी (विनियमन) विधेयक २०२५ हे विधेयक बुधवार, दि. २६ मार्च २०२५ रोजी दोन्ही सभागृहांनी संमत केले. यामुळे राज्यातील नोकरी शोधणा-या युवकांसाठी अधिक सुरक्षित आणि पारदर्शक प्रणाली तयार होणार आहे. तसेच खाजगी प्लेसमेंट एजन्सीच्या अनियमित कारभारावरही नियंत्रण येणार आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या कारकिर्दीत युवकांच्या कौशल्य विकासासाठी, रोजगारासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. विधानपरिषद सदस्यांनी महाराष्ट्र राज्यात रोजगार मेळाव्याची वाढलेली संख्या, त्याचा युवकांना होणार लाभ, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध होत असलेल्या रोजगाराच्या संधी असे सर्व निर्णय दूरदर्शी व मार्गदर्शक ठरणार असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी (विनियमन) विधेयक २०२५ आणण्याचा निर्णय सुद्धा ऐतिहासिक ठरेल, असे विधानपरिषद सदस्यांनी नमूद केले.
विधेयकातील ठळक बाबी
-या आधी गुमास्ता परवान्याच्या आधारे एजन्सी सुरू करता येत होती. आता प्लेसमेंट एजन्सीजना शासनाच्या नोंदणी प्राधिकरणाकडे नोंदणी बंधनकारक आहे. वैध नोंदणी प्रमाणपत्राशिवाय कार्य करता येणार नाही.
-चुकीची माहिती, खोटी कागदपत्रे, फसवणूक, माहितीचा दुरुपयोग, नोकरी प्रदान करण्यास निष्फळ ठरणे किंवा नकार देणे, शासनाच्या नावाने दिशाभूल अशा बाबी समोर आल्यास नोंदणी प्रमाणपत्र रद्द केले जाणार
-नोंदणीशिवाय कामकाज करणा-या संस्थांवर दंडात्मक कारवाई किंवा तुरुंगवासाची शिक्षा देण्याची तरतूद
-सरकारने केवळ नियमनच नाही, तर रोजगार संधी वाढवण्यासाठीही पावले उचलली आहेत. प्लेसमेंट एजन्सींसोबत रोजगार मेळावे, करिअर मार्गदर्शन, कौशल्य विकास कार्यशाळा आदी कार्यक्रम घेणे